

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
उत्तर मुंबईतील राजकारणात मोठी घडामोड घडली असून मनसे आणि भाजपला धक्का बसला आहे. विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार सुर्वे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामध्ये शिवदया मिश्रा (महामंत्री, उत्तर मुंबई भाजप), कस्तुरी रोहेकर (मनसे उपविभाग अध्यक्ष, दहिसर), राजेश मिश्रा (उत्तर भारतीय मोर्चा उपाध्यक्ष), रवी फाटक (वॉर्ड क्रमांक १२ सचिव), अमित पांडे (भारतीय युवा आघाडी अध्यक्ष, जय अंबे स्पोर्ट्स), दामूनगरचे शशिकांत पाल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी कस्तुरी रोहेकर यांनी मनसेवर गंभीर आरोप केले. निवडणुकीत उमेदवारीच्या काळात पक्षातून दबाव टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. पक्षात काम करूनही सन्मान मिळाला नाही, त्यामुळे काम करण्याची इच्छाच उरली नसल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच मनसेमध्ये जातीभेद होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “मी मेहनत घेतली, मात्र वरचे नेते आरामात बसले. स्थानिक पातळीवर कामे होत नाहीत, फक्त सूचना दिल्या जातात. इतर पक्षांचे लोक सहकार्य करतात, मात्र मनसेमध्ये वरच्या नेत्यांकडून सहकार्य मिळाले नाही,” असे रोहेकर यांनी म्हटले.
मनसेच्या अंतर्गत कारभारावर नाराजी व्यक्त करत हा पक्ष पुढे जाऊ शकणार नाही आणि त्याचा फटका आम्हा कार्यकर्त्यांना बसला, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे उत्तर मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.