Mumbai News: मुंबईत बेस्टचे कंत्राटी कर्मचारी (BEST contract workers) संपावर गेले आहेत. बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी बुधवारपासून अनेक ठिकाणी आंदोलन (BEST contract workers Protest) देखील सुरु केले आहे. या संप आणि आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. बेस्टचे महिला आणि पुरूष कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. वेगवेगळ्या मागण्यांसाठी बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत बेस्टचे कर्मचारी वेगवेगळ्या मागण्यांसाठी बुधवारपासून संपावर गेले आहेत. मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणाच्या बेस्ट डेपोमध्ये काम करणारे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचसोबत आझाद मैदान येथे देखील बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. आपल्या मुलांबाळांसोबत हे कर्मचारी आझाद मैदानात पोहचले आहेत.
समान काम, समान वेतन तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना बसमधून मोफत प्रवास देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी बेस्टचे कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत शासन आमची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
पगार वाढ आणि बेस्टमध्ये मोफत प्रवास आणि इतर मागण्यांसाठी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आज हे सर्व कर्मचारी मुंबईच्या आजाद मैदानावर एकत्र यायला सुरुवात झाली आहे. कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे बेस्टच्या दैनंदिन कामकाजावर कुठेतरी परिणाम होताना दिसून येत आहे. मुंबईतील जे मुख्य डेपो आहेत या डेपोमध्ये आज शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे रस्त्यावरुन कमी संख्येने बस धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?
- महिना १६ हजार रुपये असलेले वेतन २५ हजार रुपयांपर्यंत वाढवावे.
- बेस्ट बसमधून कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास सेवा द्यावी.
- नादुरुस्त बसची दुरुस्ती करूनच त्या आगाराबाहेर काढाव्यात.
- बंद बसमार्ग पुन्हा सुरू करावेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.