निवृत्ती बाबर -
मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सरनाईकांच्या (Pratap Sarnaik ) पत्रावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून खंत व्यक्त करत टीका केली असून हे पत्र एवढ्या उशीरा आणि केवळ दिखाव्याचे असल्याची टीका करणारं पत्र शिवसेना उपविभागप्रमूख जितेंद्र जानावळे (Jitendra Janawale) यांनी लिहलं आहे.
या पत्राद्वारे त्यांनी उशीरा घेतलेल्या भूमिकेबद्दल खंत देखील व्यक्त केली आहे. वेळेत उभा राहतो तो खरा मित्र हे माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला कळते आणि तुमच्यासारख्या नेत्यांना शेवटच्या क्षणी पत्र देऊन उशिरा कळते हे दुर्दैवअसल्याचं जानावळे यांनी म्हटलं आहे. (Andheri East Assembly By-Election)
पाहा व्हिडीओ -
जितेंद्र जानावळे यांच्या पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे - विषय : स्व रमेश लटकेंचा तुमच्यातला मित्र लवकर जागा झाला
सन्मानीय प्रतापजी आपण आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांना पत्र लिहून स्व रमेश लटकेंच्या मित्रत्वाची भावुक आठवणींना उजाळा दिलात. लटके साहेबांचे निधन दुबई येथे कसे झाले तुम्हाला त्यांच्या निधनाची पहिली बातमी तुमच्या दुबई स्थित मित्रानी दिली असता तुम्हाला खुपच धक्का बसला वैगरे वैगरे असे खुप काही आठवणी लिहून तुम्ही अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करा असे पत्र दिले आहे.
श्री प्रताप सरनाईकजीं आपल्या दिवंगत मित्रांच्या पत्नीसोबत नोकरीच्या राजीनामा प्रसंगी काय राजकारण झाले ते आपण प्रसार माध्यमातून पाहिले असाल ना? अशा वेळी तुमच्यातला मित्र कुठे हरवला होता. साध्या, भोळ्या, राजकारणापासून दूर असलेल्या वहिनींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्या वेळी तुमच्यातली मित्रत्वाची भावना कुठे गेली होती.
तुम्ही पालिकेत आयुक्तांच्या दालनात वाहिनीच्या मदतीसाठी धावून का आले नाही. मदतीला फक्त आणि फक्त धावून आले ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरें यांचे शिवसैनिक. तरी असो प्रतापजी सरनाईक साहेब आणि आदरणीय श्री राज ठाकरे साहेब उशिरा का असो पण तुमच्यातला मित्र जागा झाला हे महत्वाचे, तुमच्यासारख्या मित्रांचे अभिनंदन.
पण पत्राच्या शेवटी स्व. रमेश लटके साहेबांच्या तुम्हा दोन मित्रांना एक स्मरण करून देऊ इच्छितो दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी एक शिवसैनिक म्हणून मी भारतीय जनता पक्षाचे नेते उपमख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस साहेबांना पत्राद्वारे मागणी केली होती की अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीचे जतन करून बिनविरोध करा.
नवऱ्याच्या विरहाने दुःखद महिलेशी लढायचे नसते तिच्या सोबत उभे रहायचे असते हीच आपली संस्कृती असून दिवंगत लोकप्रतिनिधीला खरी श्रद्धांजली आहे. वेळेत उभा राहतो तो खरा मित्र हे माझ्या सारख्या सामान्य शिवसैनिकाला कळते आणि तुमच्यासारख्या नेत्यांना शेवटच्या क्षणी पत्र देऊन उशिरा कळते हे दुर्दैव आहे.
शेवटी एकच प्रार्थना तुमच्या बिनविरोध निवडणुकीच्या मागणीला यश मिळो तुमची आणि आमची अंधेरीकरांची वाहिनी ऋतुजा रमेश लटके बिनविरोध आमदार होवो हीच खरी मित्रत्वाची श्रद्धांजली असा मजकूर जितेंद्र जानावळे यांनी आपल्या पत्रात लिहला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.