

Nilesh Thigale appointed as Pune district youth president : पुणे महापालिकेत झालेल्या पराभवानंतर तात्काळ अजित पवार यांनी आज पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. बैठकी दरम्यान, अजित पवार यांनी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या बैठका सुद्धा घेतल्या. या बैठकीला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नाचे उत्तरे मिळण्यापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्हा युवक अध्यक्षपदी निलेश थिगळे यांची नियुक्ती करणयात आली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीदरम्यान युवा नेतृत्वाला मिळणार संधी?
पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीत भाजप ने तरुणांना संधी दिली आणि याचं अनेक युवा मंडळींनी त्याचं सोनं केलं आणि जागा जिंकून आणल्या. आता हाच फॉर्म्युला घेऊन अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवणार अशी शक्यता आहे. येत्या काळात अधिकाधिक तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसे आणता येईल, युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य कसे देता येईल यावर पक्षातील नेत्यांकडून विचार केला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
गेल्या ९ वर्षांपासून पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निलेश थिगळे कार्यरत होते. थिगळे हे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरचे आहेत. संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव आणि युवकांमध्ये असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांच्यावर आता अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निलेश थिगळे यांनी तयारीही सुरू केली होती. मात्र ऐनवेळी पक्षप्रमुख अजित पवार यांनी थिगळे यांच्यावर जिल्हा युवक संघटनेची मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
माध्यमांशी बोलताना थिगळे म्हणाले, “पक्ष संघटनेच्या माध्यमातून काम करणारे अनेक नेते आज राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दादांनी मला विश्वासात घेऊन माझी गरज सध्या पक्षाला अधिक असल्याचे पटवून दिले. त्यामुळे त्यांनी दिलेली जबाबदारी मी नक्कीच पूर्ण ताकदीने पार पाडेल."
दोन्ही राष्ट्रवादी काही तालुक्यात एकत्र येणार
अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला दुपारनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार रोहित पवार यांनी उपस्थिती लावली. बैठकीनंतर रोहित पवार म्हणाले, "जिल्ह्याचे काही प्रमुख आज आले होते, जे इच्छुक होते लढायला ते सुद्धा इथे आले होते. काही तालुक्यात कार्यकर्ते म्हणतात एकत्रित लढायचे आहे. काही तालुक्यात आम्ही एकत्र लढणार आहोत, काही ठिकाणी वेगळं लढू. चिन्ह कुठलं घ्यायचं हे स्थानिक नेते ठरवतील."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.