Maharashtra Politics : विधानसभेसाठी अजित पवारांची मोठी खेळी; अभिनेते सयाजी शिंदेंनी पक्षप्रवेश करताच दिली मोठी जबाबदारी
रुपाली बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने बैठकांचा सपाटा लावला आहे. विधानसभेआधी अजित पवार गटात पक्षप्रवेश सोहळे सुरु आहेत. याचदरम्यान, दिग्गज अभिनेत्याने अजित पवार गटात प्रवेश केलाय. आज शुक्रवारी अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवारांनी त्यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली आहे.
अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घातलं. लाडक्या अभिनेत्याने पक्षप्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, 'मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण सयाजी शिंदे यांचे काही चित्रपट पाहिले आहेत. महाराष्ट्रातून कलाकार पुढे आला आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नाव केलं, तर मला आनंदच होतो. सयाजी शिंदे यांच काम समाजात जागरुकता वाढवतात'.
'सरकारमध्ये काम करताना विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क येतो. ते सह्याद्री देवराई या माध्यमातून उपक्रम राबवतात. मी काही भागात त्यांचं काम पाहिलं आहे. अनेकदा अनेक तक्रारी येतात. आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सिद्धिविनायक आणि शिर्डीत गेल्यावर प्रसाद दिला जातो. त्या ऐवजी एक रोपटे प्रसाद म्हणून दिले पाहिजे, असं त्यांनी सुचवलं. विधानसभा निवडणुकीत ते राज्यात स्टार प्रचारक म्हणून काम करतील. त्यांचा पक्षात योग्य सन्मान राखला जाईल. मला विजयादशमीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या निर्णयाचे खूप समाधान आहे, असे अजित पवार म्हणाले.
'आम्ही पक्षात बेरजेचं राजकारण करतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक भविष्यात देखील आमच्यासोबत येतील, असा मी विश्वास देतो,असेही अजित पवारांनी सांगितले.
पक्षप्रवेशानंतर सयाजी शिंदे काय म्हणाले?
अजित पवार गटात प्रवेश केल्यावर सयाजी शिंदे म्हणाले, 'मी चित्रपटात अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या आहेत. पण राजकारणात येईल, असं कधी विचार केला नव्हता. मी मंत्रालयात २५ वेळा गेलो आहे. त्यात १५ वेळा अजित पवारांना भेटलो. अजितदादांना भेटणे म्हणजे पहाटे ६ आणि ७ वाजता भेटणे. मागील ८ दिवसांत हा निर्णय झाला. काही विषय सिस्टममध्ये राहून लवकर मार्गी लावता येतील'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.