>> संदीप नागरे
हिंगोली : शेतातील रस्त्याच्या वादावरून हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला हात पाय बांधून घरात डांबून ठेवत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डांबून ठेवलेल्या कर्मचाऱ्याची पोलिसांनी सुटका करत त्याचा जीव वाचवला आहे. २१ नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Hingoli News)
हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत रामकिसन हराळ यांना ही मारहाण झाली आहे. मूळच्या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या खडकी गावातील आहेत. २१ तारखेला सकाळी कार्यालयात येत असताना शेतीच्या जुन्या वादातून या कर्मचाऱ्याला त्यांच्याच गावातील काही जणांनी पकडून डांबून ठेवत मारहाण केल्याचा आरोप या कर्मचाऱ्याने केला आहे. (Latest Marathi News)
या घटनेनंतर हराळ यांच्या नातेवाईकांनी खडकी गावातील सरपंचांना या घटनेची माहिती दिली आहे आणि गावातील तीन ते चार आरोपींनी
रामकिसन हराळ यांना स्वतःच्या घरात डांबून ठेवल्याचे सांगितले. सरपंचांनी याबाबत सेनगाव पोलिसांना माहिती दिली. सेनगाव पोलीस आरोपीच्या घरी पोहचले त्यांना आरोपीच्या घरामध्ये शिक्षण विभागातील कर्मचारी रामकिसन हराळ असल्याचे आढळले.
हातपाय बांधलेल्या अवस्थेत हराळ पोलिसांना आढळल्याने पोलिसांनी तातडीने त्यांची सुटका करत त्यांना रुग्णालयात दाखल केले. हराळ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गावातील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करत यातील काही जणांना अटक केली. तर याच प्रकारात गावातील एका महिलेच्या तक्रारीवरून हराळ यांच्यावर देखील ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या आठ दिवसांनी अचानक सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सेनगाव पोलिसांनी या घटनेची सविस्तर माहिती देताना घरात डांबून ठेवलेला फिर्यादी रामकिसन हराळ व आरोपी यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या कारणावरून वाद आहे.
सेनगाव पोलिसात या प्रकरणी अनेक एकमेकांच्या विरोधात तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. मात्र तरी देखील आरोपींनी शासकीय कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यासाठी जात असताना वाटेत आडवून घरात डांबून ठेवत अशाप्रकारे मारहाण करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आम्ही प्रकरण संवेदनशील पणे हाताळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.