उद्योग क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असून उद्योजकांचा राज्यावरील विश्वास आणि आपली पत वाढून महाराष्ट्राची उद्योगस्नेही ही ओळख पुन्हा प्रस्थापित झाली आहे. राज्य शासनाने विकासाचा अटलसेतू पार केला असून समृद्धीच्या महामार्गाने, एक्सप्रेस वे वरुन बुलेट ट्रेनच्या वेगाने विकास करीत राज्य सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विधानसभेत नियम 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. गेल्या दोन वर्षांत दावोसमध्ये पाच लाख कोटींच्या परदेशी गुंतवणुकीचे करार झाले आहेत. गेल्यावर्षीच्या करारांपैकी 80 टक्के करारांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यातून सुमारे तीन ते साडेतीन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. पूरक उद्योगांमुळे आणखी काही लाख लोकांना रोजगार मिळेल. देशातला पहिला ग्रीन हायड्रोजनचा प्रकल्प महाराष्ट्रात येतोय. राज्याला एक ट्रीलियन डॉलर्स इकॉनॉमी बनविण्याचा निर्धार असून तो आम्ही नक्की पूर्ण करू, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य शासन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम करत आहे. निर्धारित वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे. साडे सहा लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते, त्यांच्या कर्जफेडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली. राज्य शासन बळीराजाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्र सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत 16 हप्त्यांमध्ये 29 हजार 520 कोटी रुपये बँक खात्यावर जमा केले आहेत. केंद्र सरकारच्या योजनेपासून प्रोत्साहन घेत राज्य सरकारनेही ‘नमो शेतकरी महासन्मान’ निधी योजना सुरू केली आहे. पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 1720 कोटी रुपये जमा झाले होते. नुकतेच दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटीचे 3800 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. 88 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला असून एकूण 5520 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. या दोन्ही योजनेअंतर्गत 35 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा झाले आहेत. अवेळी पाऊस, गारपीट अशा अस्मानी संकटामुळे अडचणीत आलेल्या बळीराजाला आपल्या सरकारने विक्रमी मदत केली आहे. शेतकऱ्यांसाठी गेल्या पावणे दोन वर्षांत 15 हजार 212 कोटी रुपयांची मदत दिली आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या योजनांसाठी 30 हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनांना चालना दिली आहे. (Latest Marathi News)
राज्यातील महिला, भगिनींच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. नुकतेच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले. ‘लेक लाडकी’ योजनेमुळे 18 वर्षांपर्यंतच्या मुलींचे भविष्य सुरक्षित केले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये नुकतीच 20 टक्के वाढ केली आहे. त्यांना सुधारित मानधन अदा करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्यात आले आहेत. यामुळे या अंगणवाडी सेविकांचे काम सुलभ आणि गतीने होईल. अंगणवाडी केंद्रांमधील 20 हजार रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. बचत गटांच्या भाग भांडवलात, सीआरपींच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. आशासेविकांना देखील न्याय दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासन कोणत्याही गुन्हेगारीचे समर्थन न करता आकसापोटी कुणावरही अन्याय केला जाणार नाही, तथापि कायदा मोडणाऱ्यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्र शिंदे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मुंबई, पुणे येथे ड्रग्जच्या विरोधातली मोहिम तीव्र केली आहे. कायदा सुव्यवस्थाही बळकट असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध शासकीय-निमशासकीय विभागांमध्ये 75 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र प्रत्यक्ष निर्णयाची अंमलबजावणी करताना 75 हजारांच्या तीनपट म्हणजे एक लाख 61 हजार 841 पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यंत शासकीय-निमशासकीय विभागांमध्ये 45 हजार 152 पदांवर नियुक्तीचे आदेश दिले आहेत. सहा हजार पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच त्यांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत, हे शासनाचे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. अनुकंपा तत्त्वावर सुमारे तीन हजार 334 उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत. राज्यभर आता नमो महारोजगार मेळावे सुरु आहेत, नागपूर, लातूर, अहमदनगर मेळाव्यात 20 हजार पेक्षा जास्त तरुणांना रोजगार मिळाले आहेत. पुढे अजून बारामती, ठाणे येथे महारोजगार मेळावे याच आठवड्यात होणार असून शासन आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत सव्वा तीन कोटी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
गेल्या पावणेदोन वर्षांत आपला महाराष्ट्र सर्वंच क्षेत्रात नंबर वन आहे. एक लाख कोटीपेक्षा अधिक विदेशी थेट गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकवर आहे. आठ लाख कोटी रुपयांची कामे राज्यात सुरू आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या कामातही महाराष्ट्र नंबर वन आहे. इन्कम टॅक्स, जीएसटी आणि जीएसडीपी मध्येही महाराष्ट्र नंबर वन आहे. निर्यातीमध्ये, स्टार्टअपमध्येही महाराष्ट्र नंबर वन आहे. देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आपण उभारला तिथेही महाराष्ट्र नंबर वन आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंकचा टनेल उभारण्यातही आपला महाराष्ट्र नंबर वनच आहे. स्वच्छतेत देखील महाराष्ट्र नंबर बनला आहे. मुंबईमध्ये दर आठवड्याला डीप क्लीन मोहिमेत तर सहभागी झालो. यामुळे रस्त्यावरची धूळ कमी झाली, उपनगरे, समुद्र किनारे, रस्ते स्वच्छ होत आहेत. मुंबईतले प्रदुषण कमी झाले आहे. ही मोहीम आता राज्यव्यापी होत आहे. राज्यभरात स्वच्छतेची स्पर्धा सुरू झाली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महाराष्ट्र महामार्गाचा तिसरा टप्पा आता सुरू करत आहोत. भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा समृद्धी महामार्ग आता लवकरच खुला होत आहे. समृद्धी महामार्ग गडचिरोली, भंडारा, गोंदियापर्यंत वाढविण्यात येणार आहे. मुंबई कोस्टल रोड, मेट्रो तीन, पुणे मेट्रो, मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे लवकरच लोकार्पण होणार आहे. नागपूर-गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग, कोकण कोस्टल रोड, कोकण एक्सप्रेस वे, महाराष्ट्रात सात हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे ग्रीड केले जात आहे. त्यामुळे चांदा ते बांदा जोडले जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका सुरुवातीपासून होती. 10 टक्के आरक्षण दिलेय आणि त्याची अंमलबजावणीसाठी करून 26 फेब्रुवारीपासून कायदाही लागू केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आता पोलिस आणि शिक्षक भरती सुरू आहे. तिथेही मराठा आरक्षणाचा लागू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.