कैलास चौधरी, साम टिव्ही
उस्मानाबाद : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. शासकीय रुग्णालयात डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेची प्रसुती चक्क स्वच्छतागृहातच झाली. महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचा बोजवारा उडवणारी सदरील घटना आरोग्यमंत्री तान्हाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या जिल्ह्यातील शासकीय महिला रुग्णालयात घडली. या घटनेनंतर परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं काय घडलं?
रुक्मिणी असं प्रसुती झालेल्या महिलेचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, रुक्मिणी या तुळजापूर तालुक्यातील मसाला गावातील रहिवाशी आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास रुक्मिणी यांना अचानक प्रसुती कळा होऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने शासकीय महिला रुग्णालयात उपचारासाठी आणलं.
मात्र, रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्यांना आवश्यक ती सेवा मिळाली नाही. शासकीय महिला रुग्णालयात अगोदरच अनेक महिला डिलिव्हरीसाठी दाखल असल्याने रुक्मिणी यांना बेडही उपलब्ध झाला नाही. रुग्णालयात असलेल्या दोन परिचारिकांनी रुक्मिणी यांना परिसरात चकरा मारा असा सल्ला दिला.
दरम्यान, रुग्णालय परिसरात चकरा मारत असताना रुक्मिणी यांना अचानक त्रास झाला. त्यानंतर त्या तातडीने रुग्णालयातील स्वच्छतागृहात गेल्या. याचवेळी त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या आणि तिथेच त्यांची डिलिव्हरी झाली. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.
विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील शिंदे सरकारमधील आरोग्यमंत्री तान्हाजी सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातच महिलांना प्रसूतीसाठी अशा संकटाचा सामना करावा लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच असे प्रकार घडत असल्याने दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सदरील महिला आणि तिचं बाळ सुखरूप असल्याची माहिती आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.