
What is Uddhav Thackeray's plan to stop leaders from leaving Shiv Sena?: विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू आहे. अनेक विश्वासू शिलेदार ठाकरेंची साथ सोडून गेले. ठाकरेंची शिवसेना खिळखिळी झाली, असं म्हटलं जाऊ लागले. कोकण, मुंबई, ठाणे,नाशिकसह मराठवाड्यातून अनेकांनी ठाकरेंची साथ सोडली. यावर उद्धव ठाकरेंनी पुढचा मास्टरप्लान काय, हे लोक सोडून गेल्यानंतर पुढे काय करणार, याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी आऊटगोईंगवर स्पष्टच भूमिका मांडली. खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. गेलेल्यांना जाऊ द्या, त्याची जागा नवीन माणूस घेईल, असं वक्तव्य ठाकरेंनी केलेय. यावेळी बोलताना ठाकरेंनी भाजप अन् शिंदेंच्या शिवसेनेवर घणाघती टीका केली.
ज्यांना घडवलं, निवडून आणलं, कालपर्यंत जे तुमचा जयजयकार करत होते, ते मोहाला बळी पडले. हे पाहून राजकारणाचा उबग येतो का?
राजकारणाचा उबग म्हणण्यापेक्षा अशा राजकारण्यांचा उबग येतो. कारण हे जे काही चाललं आहे, ते राजकारण नाही. बाळासाहेब जसं म्हणायचे तसं हे गजकरण आहे. ही सत्तेची खाज आहे. जेवढं खाजवाल तेवढं कमी पडतं. केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळाली तरी सोसायटी, दूध संघाची सत्ताही यांनाच हवी आहे. तिथेही माझाच माणूस हवा आहे. असं सत्तेचं गजकरण त्यांना झालं आहे.
विधानसभा-लोकसभा प्रमाणेच महापालिकेतही फोडाफोडी होणार?
हे लोक निवडणुकीचा प्रचार करतातच कशाला? असंच जर करायचं असेल तर सरळ निवडून आलेले आमदार-खासदार फोडून राज्य स्थापन करा ना. प्रचाराला जाऊच नका!
राजकारणातले लोक जंगली जनावरांपेक्षा हिंस्र झालेले दिसतात
हिंस्र आणि जंगली यात फरक आहे. हिंस्र हे राजकारणी असतात. जंगली प्राणी म्हणजे हिंस्र नाही. जंगलात कारण नसताना कोणी कोणावर हल्ला करत नाही. वाघ, सिंह हे भूक लागल्याशिवाय शिकार करत नाहीत. तो निसर्ग नियम आहे. ते भुकेपुरतीच शिकार करतात. आज एक मारलं, उद्यासाठी एक मारू असं नाही. प्राणी मारून फ्रीजमध्ये ठेवणं असला प्रकार तिथं नाही. राजकीय पक्ष जसे सत्ता मिळाली तरी आणखी आमदार, खासदार घ्या असं करतात तसं वाघ, सिंह करत नाहीत. हे लोक राजकारण्यांना फोडतात आणि थंड करून सत्तेच्या शीत कपाटात ठेवतात.
आपल्या पक्षातून जे आऊटगोइंग सुरू आहे, त्यावर उपाय काय?
काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडासा आऊटलेट द्यावा लागतो आणि नवीन झरा यावा लागतो. कधी कधी भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी एखादा माणूस अयोग्य असला तरी आपण बाजूला करत नाही, पण जेव्हा तो स्वतःहून जातो आणि त्याची जागा दुसरा घेतो तेव्हा बरं वाटतं की, चला एक ‘बला’ गेली! आता जे आमच्यातून गेले ते तिकडे जाऊन काय दिवे लावताहेत ते तुम्ही बघताच आहात. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे.
बाळासाहेब म्हणायचे शिवसेना हे लोहचुंबक आहे. एक विचार म्हणून लोक त्याला चिकटून राहायचे. त्या चुंबकाचा असर कमी झालाय का?
सर्वसामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता जो कधी काही मागण्यासाठी माझ्याकडे किंवा शिवसेनाप्रमुखांकडे आलाच नव्हता. त्यांच्या पिढय़ान्पिढय़ा आजही शिवसेनेसोबत आहेत. कुठलीही ओळख नसताना ज्यांना शिवसेनेनं मोठं केलं, त्यातले काही गेले, पण त्यांना मोठं करणारे अजूनही माझ्यासोबत आहेत. हीच माझी शक्ती आहे आणि तीच यांची खरी पोटदुखी आहे की, इतपं करूनही हे संपत कसे नाहीत?
गिरीश महाजनांसारखे मंत्री शिवसेनेला जमीनदोस्त करण्याची भाषा करतात...
शिवसेना जमिनीचा दोस्तच आहे म्हणून तर हे लोक शिवसेना संपवू शकत नाहीत. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि मुळं जमिनीत खोलवर गेलेली आहेत. तुम्ही जमिनीचे शत्रू आहात म्हणून तुम्ही मुंबईसह सगळी जमीन तुमच्या मित्राच्या घशात घालत आहात. तुम्ही जमिनीचे शत्रू आणि आम्ही जमिनीशी दोस्ती करणारे दोस्त आहोत.
शिंदे म्हणतात, मी फक्त अर्ध्या दाढीवरून हात फिरवला. पूर्ण दाढीवरून हात फिरवला तर काय होईल?
शिंदेंची अर्धी दाढी राहिलीय हे नशीब. त्यांनी जास्त बोलू नये, नाहीतर लोक त्यांची बिनपाण्याने करतील. राहिलेली अर्धी दाढीही काढतील. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, तिथे दाढीचा उपयोग का करत नाहीत?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.