मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे राजकीय डावपेच रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी आज शिवडी येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांना शिवसेना संपवायची आहे. ठाकरे-शिवसेना नातं त्यांना तोडायचं आहे. पण ठाकरे आणि सेना नातं घट्ट राहणार आहे. तुमच्यात मर्दपणा असेल तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या नावावर निवडून या, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटासह विरोधकांवर केला आहे.
शिवडीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे विरोधकांवर टीका करताना म्हणाले, 'त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याखेरीज पर्याय नाही. काल एका पक्षाने त्यांना ऑफर दिली आहे. मी पुढच्या महिन्यापासून महाराष्ट्र फिरणार आहे. त्यांना शिवसेना संपवायची आहे. ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे. पण ठाकरे आणि सेना नातं घट्ट राहणार आहे. तुमच्यात मर्दपणा असेल तर माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या नावावर निवडून येऊ द्या. त्यांनी स्वत: आई-वडिलांना महाराष्ट्रात घेऊन मते मागावी. आता वडिलही घ्यायला चालले आहेत'.
मराठी माणसाला, हिंदुत्वाला तोडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तुमचं आणि भाजपचं हिंदुत्व काय ? शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते, तर भाजप राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करते. एखादा मुख्यमंत्री पायउतार होतो, तेव्हा लोक हळहळतात. हे तुमच्यामुळे झालं. मी वर्षा निवासस्थान सोडलं. पण मातोश्रीत आल्यावर माझी मूळ शक्ती मला मिळाली', असेही ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठवून एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या सहकार्याने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. शिंदे गटाच्या बंडाळीमुळं महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेला जोरदार धक्का बसला. एवढच नाही तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही शिवसेनेचे नगरसेवक, आजी-माजी आमदार, खासदार शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात आणखीनच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे गटावर तोफ डागण्यास सुरुवात केली आहे.
शिवडीतील शिवसेनेच्या अभ्युदयनगर येथील २०५ क्रमांकाच्या शाखेचं नूतनीकरण करण्यात आलं. या शाखेचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. या उदघाटनाप्रसंगी खासदार अरविंद सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासहित सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, आज ते म्हणतात आम्ही मुख्यमंत्री केलं, मग अडीच वर्षापूर्वी का नाही केलं. आज मनावर दगड ठेऊन मुख्यमंत्री केलं, हे अडीच वर्षापूर्वी केलं असतं तर भाजपच्या दगडाला शेंदूर लागला असता. अडीच वर्षांचं ठरलं होतं. मग तेव्हा शक्य होत नव्हतं, मग आज कसं शक्य झालं ? आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य घडवायचं आहे. त्यांनी कोणत्या शक्तीशी पंगा घेतला आहे, त्यांना ठाऊक नाही. शिवसेनेने ज्या दगडाला शेंदूर फासला होता, ते गिळायला बसले आहेत. त्यांच्या मागे महाशक्ती आहे, महाशक्ती कळसूत्री आहे, त्यांना शिवसेना संपवायची आहे'.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.