अहमदनगर : सौताडा (ता.पाटोदा) येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या दरीत ग्रामसेवक झुंबर मारुती गवांदे यांच्यासह मृतदेह पोलिस प्रशासनाने स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शनिवार ( ता.02) रोजी दुपारी बाहेर काढला. शवविच्छेदनानंतर पाटोदा पोलिसांनी मृतदेह गवांदे यांच्या नातेवाईकांकडे सूपूर्द केला.
या संदर्भात अधिक माहिती अशी ः श्री क्षेत्र रामेश्वर (सौताडा ता.पाटोदा ) येथील दरीत एका 50 वर्षीय इसमाने उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना शुक्रवारी (ता.24)रोजी घडली होती. त्यावेळी श्रीगोंदा तालुका पंचायत समितीचे ग्रामसेवक गवांदे यांचे ओळख पत्र, मोटारसायकल व इतर साहित्य पोलिसांना आढळून आले होते. त्यावरुन वरून हा इसम झुंबर मारुती गवांदे ग्रामसेवक पंचायत समिती कार्यालय श्रीगोंदा आहे; अशी प्राथमिक माहिती पोलिस प्रशासनाकडे होती. त्यानंतर प्रशासनाने शोधाशोध करुनही गवांदे यांचा तपास लागला नव्हता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली की बेपत्ता झाले, या बाबत संदिग्धता निर्माण झाली होती.
दरम्यान तहसीलदार सुनील ढाकणे यांनी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट करुन धबधबा सुरू असतानाही शोध सुरुच ठेवला होता. शनिवारी (ता.02) सकाळी गवांदे यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सौताडा येथील स्थानिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सकाळपासून शोधकार्य सुरू केले. शुक्रवारी रात्री श्री.क्षेत्र रामेश्वरच्या वरच्या बाजूला झालेल्या पाऊसामुळे धबधब्याचा प्रवाही वाहता झाला होता. धबधब्याच्या जवळच अडकलेला मृतदेहदेखील बाहेर आला त्यामुळे शोध लागला.
पाचशे फूट खोल दरीतून स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठ्या कसरतीने तो मृतदेह रामेश्वर दरीतून वर आणला. त्यानंतर पाटोदा पोलिसांत गुन्ह्याची नोंद करून शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह गवांदे यांच्या नातेवाईकांकडे हवाली केला.
गवांदे यांनी आत्महत्या केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही आत्महत्या कुणाच्या दबावातून केली. यासाठी अगोदरच आक्रमक झालेल्या ग्रामसेवक संघटना नेमकी काय भूमिका घेते, ते महत्वाचे आहे. शिवाय गवांदे यांच्या घरचे लोक याप्रकरणी पोलिसांना काय माहिती देतात याकडेही लक्ष राहील.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.