अकोला : वाहतूक पोलीस (Traffic police) म्हटले की, दंड किंवा मेमो फाडल्याची धास्तीच बसते. अकोल्यात (Akola) मात्र या उलट शहर वाहतूक शाखेच्या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये पोलिसांची प्रतिमा उजळली आहे. कोरोनासारख्या (Covid 19) संकट काळात वाहतूक शाखेने विविध आदर्श उपक्रमांचा ‘अकोला पॅटर्न’ यशस्वी केला. अशी माहिती अकोला शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिली आहे. (The 'Akola pattern' of traffic police became statewide)
विशेष म्हणजे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी देखील दखल घेतली आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये अकोला शहर वाहतूक शाखेच्या विशेष मोहिमेचे अनुकरण करण्यात येत आहे. 'नो मास्क नो सवारी', ऑटोचालकांचे नेत्रतपासनी शिबीर, त्यांना महिनाभर राशन, आवाज करणारे सायलेन्सर रोडरोलर खाली केले नष्ट, एक कॉल करा मदत मिळवा, अशा मोहीम राबविल्या.
अकोल्यातील बेताल वाहतूक, त्यातच निर्माणाधीन उड्डाणपूल, रस्ते व मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यात पोलिसांची तारांबळ उडते. तारेवरच्या कसरतीप्रमाणे कर्तव्य बजावत असतानाच शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला सामाजिक कार्य आणि माणुसकीच्या कार्याची जोड दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या संकल्पनेतून वेगवेगळे उपक्रम व मोहीम राबविल्या आहेत. काही दिवसांमध्येच त्याला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले अन् वाहतूक शाखेचा ‘अकोला पॅटर्न’ राज्यातील विविध शहरांमध्ये पोहोचला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत एकटे पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शहर वाहतूक शाखेने ‘एक कॉल करा, मदत मिळवा’ ही मोहीम सुरू केली. अडचणीत असलेल्या असंख्य ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक शाखेच्या मदतीचा आधार मिळाला. टाळेबंदीमध्ये सर्वच बंद असल्याने ऑटो चालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. आजारी व ज्येष्ठ ऑटोचालकांची उपासमार होत असतांना सामाजिक संस्थांची मदत घेऊन वाहतूक शाखेने त्यांना एक महिन्याचा संपूर्ण शिधा पुरवला. ऑक्टोबर २०२० पासून कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्यावर मास्क वापराविषयी जनजागृती होण्यासाठी ‘नो मास्क, नो सवारी’ ही मोहीम सुरू केली. शहरातील पाच हजार ऑटोंवर जनजागृती फलक लावून ऑटो चालक व प्रवाशांना मास्कची सक्ती केली. या मोहिमेची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: घेतली व राज्यातील सर्वच जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना केल्या.
रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यावर शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील पोलीस विभागातील पहिले रक्तदान शिबीर अकोला शहर वाहतूक शाखेने घेतले. तसेच अपघात कमी करण्यासाठी २५० ऑटो चालकांची नेत्र चिकित्सा करण्यात आली. तत्कालीन गृहमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपक्रमांची दखल घेत कौतुक केले.
एवढेच नव्हे तर, फटाके फोडणाऱ्या बुलेट सर्वच शहरांमधील नागरिकांची डोकेदुखी ठरलेल्या आहेत. अकोल्यातही हा त्रास प्रचंड वाढल्याने वाहतूक शाखेने बनावट ‘सायलेन्सर’ थेट नष्टच केले. 54 चालकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यासह न्यायालयाचा आदेश घेऊन रोडरोलरखाली ‘सायलेन्सर’ चिरडण्यात आले. तसेच बनावट सायलेन्सर विकणाऱ्याला ही चांगलीच चपराक दिली. ‘अकोला पॅटर्न’मधील ही विशेष मोहीम महाराष्ट्रासह राज्याबाहेरील विविध शहरांमध्ये सुद्धा राबविण्यात येत आहे.
रस्त्यात सापडलेल्या विविध वस्तू मूळ मालकाचा शोध घेऊन त्याला परत करण्याचा विशेष उपक्रम देखील वाहतूक शाखेने सुरू केला. या मोहिमेत ऑटो चालक देखील हिरिरीने सहभागी झाले आहेत. आतापर्यंत 20 मोबाइल, दहा पर्स, 14 पाकीट व महत्त्वाची कागदपत्रे मूळ मालकांना परत देण्यात आले. या मोहिमेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.