संजय जाधव, बुलडाणा
Buldhana News: राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये (Swabhimani Shetkari Sanghtana) फूट पडणार असून रविकांत तुपकर हे दुसरा गट स्थापन करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहेत. अशामध्ये रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी बुलडाण्यामध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहूनच काम करणार असल्याचे सांगत रविकांत तुपकर यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्त पालन समिती आज पुण्यामध्ये बैठक आहे. या बैठकीला रविकांत तुपकर उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. म्हणूनच ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ स्वाभिमानीत देखील दुसरा गट स्थापन करणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आले आहे. अशामध्ये रविकांत तुपकर यांनीच स्वत: आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
रविकांत तुपकर यांनी सांगितले की, 'त्या बैठकीला जाण्याचे कारणच नाही. वेळोवेळी मी राजू शेट्टी यांना माझं म्हणणे मांडले आहे. त्यावर अजूनपर्यंत कुठलीही भूमिका घेतली नाही. आणि मी या बैठकीला येणार नाही हे त्यांना मी सांगितले होते. त्यामुळे मी पुढे आता शेतकऱ्यासाठी काम करत राहणार आहे.' तसंच, 'ही चळवळ मोठी करणार आहे. मला शेतकऱ्यांचे काम करायचे असून शेतकऱ्याच्या पोरांची मोठी फौज उभी करायची आहे.' अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी मांडली आहे.
त्यासोबतच, यावेळी रविकांत तुपकर यांनी मी कुठल्याही पक्षात जाणार नाही हे देखील स्पष्टपणे सांगितले. शेतकऱ्यासाठी काम करित राहणार आणि चळवळीचा झेंडा पुढे घेऊन जाणार अशी स्पष्ट भूमिका तुपकरांनी या पत्रकार परिषदेमध्ये मांडली आहे. त्यामुळे रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या माध्यमातून त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.