Kolhapur ऊस दरवाढीवरून शेतकऱ्यांचा आक्रोश, २४ तासांपासून महामार्ग अडवला; वाहतूक खोळंबली, भाजीपाला ४० टक्क्यांनी महागला

Kolhapur Farmer Protest: कोल्हापूरमध्ये शेतकरी आक्रमक झाला आहे. ऊसदरवाढ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी २४ तासांपासून पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली.
Kolhapur ऊस दरवाढीवरून शेतकऱ्यांचा आक्रोश,  २४ तासांपासून महामार्ग अडवला; वाहतूक खोळंबली, भाजीपाला ४० टक्क्यांनी महागला
Kolhapur Farmer ProtestSaam Tv
Published On: 
  • ऊस दरवाढीच्या मागणीसाठी कोगनोळी टोलनाक्यावर महामार्ग रोको

  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे पुणे- बंगळुरू महामार्ग ठप्प

  • कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले

  • कोल्हापूरहून बेळगावला जाणाऱ्या १०० हून अधिक एसटी बस रद्द

  • राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महामार्ग रोको आंदोलनाचा फटका आता हजारो वाहनचालकांना बसत आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील आंदोलनाला २४ तास होत आले तरीही वाहतूक पूर्ववत झालेली नाही. कोल्हापुरातील लक्ष्मी टेकडी आणि फाईव्ह स्टार एमआयडीसी परिसरात हजारो ट्रक आणि कंटेनर अडकून पडलेत. या वाहनांमधून विविध राज्यांमध्ये मालाची वाहतूक केली जाते. मात्र, महामार्ग ठप्प झाल्याने मालवाहतुकीसोबतच वाहनचालक आणि क्लीनर यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याचीही मोठी गैरसोय होत आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बेमुदत महामार्ग रोको आंदोलनाचा फटका आता थेट कोल्हापूरच्या भाजीपाला बाजाराला बसू लागला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेवर भाजीपाला आणि नाशवंत मालाची वाहतूक करणारे ट्रक आणि कंटेनर अडकून पडल्याने कोल्हापूरच्या बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. याचा परिणाम दरांवर झाला असून काही भाज्यांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोगनोळी टोलनाक्यावर बेमुदत महामार्ग रोको आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमेवर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. भाजीपाला आणि इतर नाशवंत माल घेऊन जाणारे अनेक ट्रक आणि कंटेनर अडकून पडले आहेत. कोल्हापूरच्या बाजारात बेळगाव, गटप्रभा आणि परिसरातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. मात्र, वाहतूक विस्कळीत झाल्याने भाजीपाल्याची आवक घटली असून, त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे.

भेंडीचे दर किलोमागे ८० रुपयांवरून १०० रुपये, ढबू मिरची ७० वरून ८० रुपये, गाजर ६५ वरून ८० रुपये, तर वांगी ८५ वरून १०० रुपयांवर पोहोचली आहेत. वाटाण्याचे दर १८० वरून २०० रुपये आणि बीन्सचे दर ९० वरून १०० रुपये किलो झाले आहेत. हिरव्या मिरचीचे दरही ७० वरून ८० रुपये किलोवर गेले आहेत. घाऊक बाजारातही दरवाढीचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. फुलकोबीचा दर २०० रुपयांवरून ३५० रुपये, तर कोबीचा दर ६० रुपयांवरून १०० रुपये झाला आहे. कोथिंबिरीच्या एका जुडीचा दर १५ रुपयांवरून ३० रुपयांवर पोहोचला आहे. १० किलो वांग्यांचा दर ५०० रुपयांवरून ६०० रुपये झाला आहे.

स्वाभिमानीच्या आंदोलनाचा एसटी महामंडळाला फटका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोगनोळी टोलनाक्यावरील महामार्ग रोको आंदोलनाचा फटका आता राज्य परिवहन महामंडळालाही बसू लागला आहे. कोल्हापूरहून बेळगावला जाणाऱ्या शंभरहून अधिक एसटी बस मंगळवारपासून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बेळगावच्या दिशेने जाण्यासाठी कोल्हापूर एसटी स्थानकात आलेले शेकडो प्रवासी अडकून पडले आहेत. बेळगावकडे एकही बस जात नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर महामार्ग रोको आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे आंतरराज्य वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूरहून बेळगावला जाणाऱ्या शंभरहून अधिक एसटी बस कालपासून रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी, कामानिमित्त, प्रवासासाठी आणि अन्य कारणांसाठी बेळगावला जाणाऱ्या शेकडो प्रवाशांना कोल्हापूर एसटी स्थानकातच थांबून राहावे लागत आहे. बेळगावच्या दिशेने बससेवा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com