विनोद पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सर्वाधिक उत्तम कामगिरी केली असली तरी त्यांची डोकेदुखी वाढलीय. कारण पवार गटानं लढवलेल्या 10 मतदारसंघांमध्ये पिपाणी चिन्हानं तब्बल 4 लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली आहेत. त्यामुळे विधानसभेला तुतारीसमोर पिपाणीचा धोका वाढलाय.त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
शरद पवार गटानं लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 जिंकत घवघवीत यश मिळवलं. मात्र शरद पवार गटाला वेगळ्याच टेंशननं सध्या सतावतंय. आणि ते म्हणजे पिपाणी हे चिन्ह. कारण राज्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लढवलेल्या 10 जागांवर पिपाणी चिन्हासह अपक्ष उमेदवारही उभे होते. आणि या सर्व उमेदवारांना मिळून तब्बल 4 लाख 32 हजार मतं मिळाली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारीच्या विरोधात अपक्ष उमेदवारांनी पिपाणी चिन्ह् घेतल्यास डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण या पिपाणीमुळेच शरद पवार गटाला साता-यात पराभव पत्करावा लागलाय. इतर मतदारसंघांमध्ये काय स्थिती आहे पाहूयात.
सातारा मतदारसंघात पिपाणी चिन्ह् असलेले अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना 37 हजार 62 मतं मिळालीयत. तर शशिकांत शिंदेंचा 32 हजार मतांनी पराभव झालाय. दिंडोरीत बाबू भगरे यांच्या पिपाणीला राज्यात सर्वाधिक तब्बल 1 लाख 3 हजार 632 मतं मिळाली. बीडमध्ये पिपाणीवर निवडणूक लढवलेल्या अशोक थोरात या उमेदवाराला 54 हजार 850 मतं मिळाली आहेत. बारामती मतदारसंघात सोयलशाह शेख या उमेदवारानं 14 हजार 917 मतं मिळवलीयत
शिरूरमध्ये मनोहर वाडेकर यांनी 28 हजार 330 मतं घेतलीयत. अहमदनगरमध्ये मोहन आऴेकर या उमेदवाराला 44 हजार 597 मतं मिळवली. माढ्यात पिपाणी चिन्ह असलेल्या रामचंद्र घुटुकडे यांना 58 हजार 421 मतं मिळाली. भिवंडीत कांचन वखारे यांच्या पिपाणी चिन्हानं 24 हजार 625 मतं घेतलीयत. रावेरमध्ये एकनाथ साळुखेंच्या पिपाणीला 43 हजार 982 मतं मिळालीय. वर्ध्यात मोहन रायकर यांच्या पिपाणीला 20 हजार 795 मतं मिळाली.
विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवाराचं मताधिक्य काही हजारांच्या घरात असतं. त्यामुळे निवडणुकीत जर तुतारीच्या विरोधात पिपाणी चिन्ह घेऊन अपक्ष उमदवार मैदानात उतरले तर शरद पवार गटाच्या उमेदवारांचं विजयाचं गणित बिघडू शकतं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारीला सर्वाधिक धोका पिपाणीचाच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.