संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी विशेष नियोजन करा, शिवसेना खासदाराने CM शिंदेंकडे केली मोठी मागणी

देशभरातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गर्दीमुळे अनेक अपघाती दुर्घटना झाल्या, कारण...
CM Eknath shinde
CM Eknath shinde Saam Tv
Published On

मुंबई : कोरोनाचे संकट दूर झाल्याने दोन वर्षांनंतर राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवात (Ganpati Festival) भाविकांची मोठी गर्दी होत आहे. याच वर्षी देशभरातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गर्दीमुळे अनेक अपघाती दुर्घटना झाल्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील मानाच्या आणि सुप्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करावी, अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते (Rahul Shewale) खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

यासाठी स्थानिक पोलीस,शासकीय अधिकारी,सामाजिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळ यांच्यात समन्वय साधून एक नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे आदेश संबधित यंत्रणांना देण्यात यावेत,तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वतः यासंदर्भात जनतेला आवाहन करावे,अशीही मागणी निवेदनात खासदार शेवाळे यांनी केली आहे.

निवेदनात खासदार शेवाळे यांनी म्हटले आहे की,यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मंदिरांमध्ये देखील भाविकांच्या गर्दीचा आकडा दररोज नवनवे विक्रम पार करताना दिसतोय.मात्र,या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात देशभरात काही दुर्दैवी अपघाती घटनाही घडल्या आहेत,ही खेदाची बाब आहे.

या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत जम्मू-काश्मीर येथील माता वैष्णोदेवी, राजस्थान मधील खाटूश्यामजी मंदिर,मथुरेतील बाके बिहारी मंदिर या तीर्थस्थळांच्या परिसरात अलोट गर्दीमुळे भाविकांना प्राण गमवावे लागले तसेच अनेक भाविक जखमी झाले. चारधाम यात्रेदरम्यान यावर्षी केदारनाथ आणि बद्रिनाथ या तीर्थस्थळांवर दरवर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक भाविकांची उपस्थिती नोंदवली गेली.या सर्व बाबी लक्षात घेता,यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे,अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com