सचिन बनसोडे
शिर्डी (अहिल्यानगर) : साई संस्थानकडे देणगी स्वरूपात सोने- चांदीचे दागिने दान स्वरूपात अर्पण केले जातात. शेकडो किलो सोने आणि चांदी संस्थानकडे आहे. यामुळे आता साई संस्थानला सोने ठेवायला जागा कमी पडतेय; अशा आशयाचे वृत्त काही माध्यमांमधून प्रसिद्ध झाले आहे. तर एका सामाजिक कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा संदर्भ देत सोने ठेवायला जागा कमी पडत असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत; याबाबत साई संस्थानने स्पष्ट खुलासा केला आहे.
शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी भाविक रोख रकमेसह सोने आणि चांदीच्या स्वरुपात देखील दान करत असतात. साई संस्थानकडे ५१४ किलो सोने आणि ६ हजार ६०० किलो चांदी जमा आहे. प्राप्त सोने ज्यात साईबाबांचे सिंहासन, साई मंदिराचा गाभारा, साईबाबांचे मुकूट, हार आणि रोजच्या वापरातील इतर साहित्याचा समावेश आहे. उर्वरित सोन्यापैकी १५६ किलो सोनं वितळून त्याची एक, दोन, पाच आणि दहा ग्रॅमची नाणी करून विकण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने २०२१ मध्ये घेतला होता. मात्र या निर्णयाला विरोध झाला होता.
त्या याचिकेवर २७ जूनला होणार सुनावणी
दरम्यान २०२३ मध्ये सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी विरोध करत औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नाणी बनवण्याऐवजी साई संस्थानने हे सोने केंद्र सरकारच्या गोल्ड मॉनिटायजेशन स्कीममध्ये गुंतवणूक करावे; अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. यामुळे हे प्रकरण २०२३ पासून न्याय प्रविष्ट असून २७ जून २०२५ रोजी यावर सुनावणी होणार आहे. मात्र साई संस्थानकडे देणगी स्वरूपात जमा सोन्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असली तरी जागा कमी पडत असल्याच्या वृत्ताने पुन्हा एकदा संस्थानकडे शेकडो किलो सोने आणि चांदी चर्चेचा विषय ठरला आहे.
संस्थानने दावा फेटाळला
दरम्यान सोन्याची नाणी बनवण्यासंदर्भात प्रकरण न्याय प्रविष्ट असतानाच साई संस्थानकडे सोने- चांदी ठेवायला जागा कमी पडतेय, असा दावा याचिकाकर्ते संदिप कुलकर्णी यांनी केला. मात्र साई संस्थानने हा दावा फेटाळून लावला असून संस्थानकडे भरपूर जागा आहे. हे सोने संस्थानच्या स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.