Beed News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची बीडमध्ये जाहीर सभा झाली. बीडमध्ये दाखल होताच शरद पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. स्वाभिमान सभेच्या माध्यमातून शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांपासून, राज्य सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
'हे सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. आता चुकीच्या लोकांना आवरण्याची वेळ आली आहे.', असे म्हणत शरद पवारांनी सरकारवर टीका केली. तसंच, 'माझं वय झालं म्हणणाऱ्यांनी थोडी माणुसकी दाखवायला शिका', असा टोला त्यांनी बंडखोरांना लगावलाय.
बीडमधील स्वाभिमान सभेमध्ये जनतेशी संवाद साधताना शरद पवारांनी सांगितले की, 'संपूर्ण जिल्ह्यात ठीकठिकाणी तुमचा उत्साह पाहिल्यावर मला जुन्या काळाची आठवण झाली. त्याकाळात या जिल्ह्याचं नेतृत्व केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होतं आता त्यांच्या नातूकडे आहे. केशरकाकूंनी जी भूमिका घेतली ती भूमिका त्यांच्या नातवांनी घेतली.'
देशातील महागाईवर लक्ष केंद्रीत करत शरद पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'आज महागाईचा प्रश्न आहे. पेट्रोल- डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. आज पाऊस, पाणी नाही. खतांच्या किंमती वाढल्या आहेत. आज शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही.'
मणिपूरच्या घटनेवरुन देखील शरद पवारांनी मोदी सरकारवर टीका केली. त्यांनी सांगितले की, 'कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात आणि देशात उद्भवला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची सरकारची जबाबदारी असते पण आज देशाची काय स्थिती आहे? मणिपूर, नागालँड, सिक्कीममध्ये काय स्थिती आहे. ही छोटी छोटी राज्य. पण या राज्यातील परिस्थिती भयंकर आहे.'
'आज समाजा-समाजामध्ये भांडणं लावली जात आहेत. सत्ताधाऱ्यांची समजामध्ये अंतर वाढवण्याची निती आहे. समाजा- समाजामध्ये भांडणं लावली जात आहेत. गावागावांमध्ये अंतर निर्माण केले जात आहे. मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढल्यानंतर, घरे- दारे पेटविल्यानंतर पंतप्रधानांनी तिकडं जाण्याची गरज होती. मात्र त्यांनी तिकडं डुंकूनसुद्धा पाहिलं नाही.', अशा शब्दात शरद पवारांनी मोदींवर टीका केली.
यावेळी मोदी सरकारवर टीका करत शरद पवारांनी सांगितले की, 'लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातो. गोव्याचं सरकार पाडलं, कर्नाटकचं सरकार पाडलं होतं. अन् हे स्थिर सरकारची भाषा करतात. तुम्ही स्थिर सरकार निवडून देण्याचे म्हणता आणि लोकांनी निवडून दिलेले सरकार तुम्ही पाडता.'
'सरकारकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. आता वेळ आलेली आहे. चुकीच्या लोकांना आवरायची. आज सत्तेचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात टाकून राजकारण करत असाल. पण सर्व शक्ती एकत्र झाली तर अशा राजकारणाला उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही.' असे त्यांनी सांगितले.
तसंच, 'मी पुन्हा येईन असे म्हणणाऱ्या पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीसांवर शरद पवारांनी टीका केली. 'ते पुन्हा आले पण मुख्यमंत्री म्हणून नाही तर उपमुख्यमंत्री म्हणून आले.', असे टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.
यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्यांचा देखील समाचार घेतला. 'पवार साहेबांचं वय झाल्यानं आपल्याला भविष्याचा विचार करावा लागणार असल्याचं एका नेत्याने सांगितलं होतं. हे माझं वय सांगातात. पण माझं काय काम बघितलं तुम्ही?, असा सवाल त्यांनी केला. 'ज्यांचं वय झालं असेल त्यांच्याविषयी थोडी माणुसकी दाखवायला शिका. नाहीतर जनता तुम्हाला माफ करणार नाही.', असं देखील त्यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.