
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टाळी दिल्यानंतर उद्धव यांनीही टाळीला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला. यावरून दोघे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडं शरद पवार आणि अजित पवार यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. त्यामुळं दोन्ही नेते पुन्हा एकत्र येणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या. आता यावरून राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी यावर भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे, दोन्ही नेत्यांनी जवळजवळ एकसारखीच प्रतिक्रिया दिल्यानं पुन्हा चर्चेला फोडणी मिळाली आहे.
गेली सहा सात वर्षे राज्याच्या राजकारणात जे उलटफेर झाले आहेत, त्यावरून किमान महाराष्ट्राच्या राजकारणात काहीच अशक्य नाही असं म्हटलं जातं. राज्यातील चार प्रमुख पक्षांपैकी दोन पक्ष फुटले. शिवसेना फुटून दोन गट पडले. कालांतरानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आणि दोन गट पडले. त्यामुळं यापुढील काळात राजकारणात काहीही होऊ शकतं, असंच पक्कं मत ज्याला राजकारण समजतं त्यांचं झालंय.
आता राज्याच्या राजकारणात तुफान चर्चा सुरू आहेत, पण त्या फुटीच्या नाहीत, तर दोन पक्ष एकत्रित येण्याच्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबाबतच्या चर्चेवर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठलीही राजकीय खलबतं होण्याचा प्रसंग नाही. अजित पवार आणि शरद पवार साहेब अनेक संस्थांमध्ये अध्यक्ष आणि सदस्यपदावर आहेत. त्यामुळं बैठकीत एकत्र राहू शकतात, असे मिटकरी म्हणाले.
महाराष्ट्रात विकासाच्या अजेंड्यावर शरद पवार साहेब आणि अजितदादा यांच्या भेटी होत असतील तर त्यात गैर काय? असा प्रतिसवालही मिटकरींनी केला आहे. या भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ नाही, असंही मिटकरींनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनीही महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांची बैठक कशासाठी होती याबाबतचा खुलासा अजित पवार यांनी केला आहे. अनेक वर्षे आम्ही दोन्ही पवारांसोबत काम केलेले आहे. त्यांच्या विचारांसोबत वाढलो आहोत. त्यामुळे एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल, असेही मुश्रीफ म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.