

योगेश काशिद, बीड | साम टीव्ही
satara doctor death family demands justice : साताऱ्यातील फलटणमध्ये एका डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली आणि अख्खा महाराष्ट्र हळहळला. तिच्यावर एका पोलीस अधिकाऱ्यानं अगणित अत्याचार केल्याची माहिती उघड झाली आणि संतापाची लाट राज्यभर पसरली. मृत्यूपूर्वी तिनं हातावर आत्महत्येचं कारण आणि त्याला कारणीभूत असलेल्यांची नावं लिहिली होती. या नोटनुसार, जनतेचा रक्षक म्हणवणारा एक पोलीस अधिकारीच तिच्या मृत्यूला कारणीभूत होता. रक्षक म्हणून मिरवणाऱ्या राक्षसानंच तिच्यावर चार वेळा बलात्कार केला होता. अगणित अत्याचार आणि मानसिक छळाला कंटाळून शेवटी तिनं आयुष्य संपवलं. डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात वेगवेगळी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. संबंधित संशयित पोलीस अधिकाऱ्याला निलंबितही केलं आहे. पण या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी तिचे कुटुंबीय आणि नातेवाईक करत आहेत.
दिवाळीला घरी येणार होती, पण...
डॉक्टर तरूणी मूळची बीडची होती. तिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिवाळीला ही तरूणी आपल्या घरी येणार होती. पण ती येण्याआधीच तिच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचली. तिला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून होत आहे.
आरोग्य विभागात भ्रष्टाचार होत असल्याची माहिती तिनं आत्महत्या करण्याआधी नातेवाईक आणि कुटुंबीयांना दिली होती. स्वतःला त्रास होत असल्याचंही नातेवाईकांना सांगितलं होतं.
पोलिसांकडून दबाव, ४ महिन्यांपूर्वीचं डॉक्टर तरुणीचं पत्र
या डॉक्टर तरुणीनं चार महिन्यांपूर्वी पोलीस उपअधीक्षकांना पत्र लिहलं होतं. ते पत्र साम टीव्हीच्या हाती लागलं आहे. या पत्राद्वारे धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तिच्यावर पोलिसांकडून प्रचंड दबाव होता. रुग्ण तंदुरुस्त असल्याचा अहवाल द्या, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. तसं या तरुणीनं पोलीस उपअधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं होतं.
याबाबत सर्वात आधी या तरुणीनं पोलीस निरीक्षकांकडे तक्रार केली होती. पण त्यांनी तिला उडवाउडवीची उत्तरे दिली होती. या पत्रात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अशा तिघांचीही नावे होती. जून महिन्याच्या १९ तारखेला तिनं उपअधीक्षकांना पत्राद्वारे ही माहिती दिल्याचे समोर आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.