उद्धवा! अजब तुझे सरकार... बंडातात्यांच्या सुटकेसाठी वारक-यांचा मुख्यमंत्र्यांवर 'राग'

विलासबाबा जवळ
विलासबाबा जवळ

सातारा : ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कऱ्हाडकर bandatatya karadkar यांना नुकतेच पाेलिसांनी स्थानबद्ध केले आहे. बंडातात्यांवरील कारवाई मागे घ्यावी व त्यांची स्थानबद्धेतून सुटका करावी अशी मागणी आज (बुधवार) व्यसनमुक्त संघाचे विलासबाबा जवळ वारकरी संप्रदायास एकत्रित करुन जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुखांना निवेदन देणार हाेते. त्यापुर्वीच मेढा पोलिसांनी विलासबाबा जवळ यांना स्थानबद्ध केले. ही माहिती नागरिकांपर्यंत पाेहचू लागली असून या प्रकाराने वारकरी संप्रदाय संतप्त झाला हाेता. दरम्यान मेढा येथील वारकऱ्यांनी चौकात एकत्र येऊन कीर्तन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची विनंती केल्यानंतर पोलिसांनी विलासबाबा जवळ यांना निवेदन देण्यासाठी बंदोबस्तात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आणले आहे. पोलिसांच्या या कृत्याचा वारक-यांनी मेढा गावात पायी दिंडी काढून निषेध नाेंदविला. (satara-marathi-news-vilasbaba-javal-bandatatya-karadkar-police-shekhar-sinh)

ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्यानंतर आता त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी बंडातात्यांनी मर्यादित लोकांची पायी वारी आळंदीतून काढणार असल्याची भूमिका घेतली होती. त्यासाठी ते आळंदीला सुद्धा दाखल झाले होते. याबाबत त्यांनी सरकारला वेळोवेळी मागणी केली होती परंतु आळंदीत असतानाच बंडातात्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन क-हाडात स्थानबद्ध केले.

विलासबाबा जवळ
शववाहिनी गंगा पाहिली, प्रेतवाहिनी चंद्रभागा होऊ देणार नाही

या प्रकारामुळे वारकर संप्रदाय नाराज झाला. दाेन दिवसांपुर्वी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मार्गदर्शक संभाजी भिडे (गुरुजी) यांनी बंडातात्यांवरील कारवाई रद्द करावी या मागणीसाठी क-हाडात माेर्चा काढला. भिडे यांनी प्रशासनास निवेदन देऊन बंडातात्यांसारख्या संत माणसास साेडून द्यावे अशी मागणी केली.

आज साताऱ्यात सरकारचा निषेध करण्यासाठी आणि बंडातात्यांची बिनशर्त मुक्तता करावी यासाठी पोवाईनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी दिंडी सोहळा व्यसनमुक्ती संघाचे विलासबाबा जवळ आणि वारकरी संप्रदाय यांच्या वतीने साडे अकरा वाजता आयाेजिला हाेता. परंतु त्यापुर्वीच पाेलिसांनी मेढा येथे विलासबाबा जवळ यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले हाेते. याबराेबरच सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वारकरी आणि युवकांची धरपकड सुरू केली हाेती. सातारा येथे जिल्हाधिकारी यांना वारीबाबत निवेदन देण्यासाठी जात असताना पोलीस प्रशासनाने अक्षयमहाराज भोसले यांना दहिवडीत स्थानबद्ध केले आहे.

दरम्यान विलासबाबा जवळ यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आणले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वारकरी संप्रदायाने आंदाेलन सुरु केले असून उद्धवा अजब तुझे सरकार अशा घाेषणा देण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com