
संजय राऊतांनी माजी उपराष्ट्रपती धनखड यांच्या ठावठिकाण्याबाबत चिंता व्यक्त केली.
अमित शहा यांना पत्र लिहून आरोग्य व सुरक्षिततेबाबत माहिती मागितली.
दिल्लीमध्ये धनखड नजरकैदेत असल्याच्या अफवा पसरल्या.
राजस्थानमध्ये धनखड समर्थक भाजप प्रवक्त्याला ६ वर्षे निलंबन.
देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून काही दिसेनासे झालेत. धनखड नेमके कुठे आहेत? त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे? नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे, त्यांच्या काही परंपरा या लोकांनी सुरू केल्या आहेत का? असा थेट सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला होता. दरम्यान, आता संजय राऊतांनी याच मुद्द्यावर बोट ठेवत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवलं आहे.
जगदीप धनखड यांचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे संजय राऊतांनी थेट अमित शहा यांना पत्र पाठवले. राऊतांनी या पत्रातून उपराष्ट्रपतींच्या आरोग्याबाबत आणि सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच धनखड यांच्या सुरक्षितता आणि आरोग्याबाबत तातडीने माहिती देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली.
राऊतांनी शहांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं की, 'आपल्याला मी हे पत्र अत्यंत गंभीर आणि चिंतेच्या परिस्थितीत लिहित आहे. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सुरक्षितता आणि आरोग्याबाबत अनेक अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरत आहे. यामुळे खरंतर आम्ही सर्वजण प्रचंड चिंतेत आहोत. दिल्लीत अफवा पसरत आहे की, धनखड यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले. ते सुरक्षित नाही, असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
'२१ जुलै रोजी संसदेच्या कामकाजादरम्यान, राज्यसभेचे कामकाज अचानक थांबवण्यात आले होते. यामागचे कारण सभापतींची प्रकृती खालावली असल्याचं सांगण्यात आलं. ही एक सामान्य घटना आहे. मात्र, त्यानंतर घडलेली घटना अधिक चिंताजनक आहे', असं राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. राऊतांनी हे पत्र गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलं. नंतर एक्स अकाऊंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
दरम्यान, राजस्थानमध्ये धनखड यांचं समर्थन करणाऱ्या प्रवक्त्याला भाजपनं ६ वर्षे निलंबित केलं. हाच धागा पकडत राऊतांनी थेट शहांना पत्रातून धनखड यांच्याबाबत माहिती देण्यासंदर्भात पत्र लिहीलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.