भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
लोकसभा निकालात महायुतीला जोरदार धक्का बसला आणि मविआने जोरदार मुसंडी मारली. त्यातच आता सगळ्याच पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. तर तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणूकीत कुणाचं सरकार येणार? यासंदर्भात सकाळ माध्यम समूहाच्या सर्व्हेत लोकांनी आपला कल स्पष्ट केलाय.
२०२४च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाचे सरकार येणार? याबाबत विचारले असता ४८.७ टक्के लोकांनी महाविकास आघाडीला पसंती दर्शवली आहे. त्याखालोखाल महायुतीला ३३. १ टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे. तर यापैकी कोणालाही नाही असं ४.९ टक्के लोकांनी म्हटलं आहे. आणि १३. ४ टक्के जणांनी अद्याप ठरलं नसल्याचे म्हटले आहे. थोडक्यात राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचे दिसत आहे.
सध्या राज्यात भाजप 103, शिंदे गट 38, अजित पवारांचा राष्ट्रवादी 40, काँग्रेस 37, ठाकरे गट 15 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आमदार असं संख्याबळ आहे. त्यातच लोकसभेला महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारलीय. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय. तर आता लोकसभेला मविआला झुकतं माप देणाऱ्या लोकांचा जुलैच्या पहिल्या आठवड्यातही मविआकडेच कल असल्याचं सकाळ-सामच्या सर्व्हेत समोर आलंय.
मात्र या सर्व्हेक्षणात भाजपलाच लोकांची पसंती असल्याचं समोर आलंय. तर महायुतीत एकत्रित लढल्यास त्याचा थेट फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळे सरकारच्या विरोधात निर्माण झालेली नाराजी कमी करण्यासाठी महायुतीला आणि आपल्या बाजूने आणखी कल वाढवण्यासाठी महाविकास आघाडीने ठोस कार्यक्रम राबवण्याची गरज आहे. त्यातूनच सत्तेचं समीकरण तयार होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.