मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत 'ते' आक्षेपार्ह विधान भाजप (BJP) नेते तथा कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना चांगलंच भोवलं आहे. काल रत्नागिरीतून त्यांना अटक केल्यानंतर जामीनासाठी दिवसभर त्यांचे प्रयत्न सुरु होते. अखेर रात्री उशीरा त्यांना महाड कोर्टाकडून १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन देण्यात आला. काल दिवसभर शिवसैनिकांनी (Shivsena) राणेंच्या विरोधात राज्यभर निदर्शनं केली हाेती. आता शिवसेनेच्या 'सामना' या मुखपत्रातून (Saamana Editorial) राणेंचा समाचार घेण्यात आला आहे. नक्की काय लिहीलंय या अग्रलेखात वाचूयात... (Saamana Editorial slams to narayan rane)
ते ऍबनॉर्मल आहेत काय ते तपासावे लागेल
“नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार अक्षरांची कमाई. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेने केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरून फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखविण्याचे ठरवले आहे. राणे यांना काही लोक ‘डराव डराव’ करणाऱ्या बेडकाचीही उपमा देतात. राणे हे बेडुक असतील किंवा भोकवाला फुगा, पण राणे कोण? हे त्यांनी स्वतःच जाहीर केले, ‘‘मी ‘नॉर्मल’ माणूस नाही,’’ असे त्यांनी जाहीर केले. मग ते ऍबनॉर्मल आहेत काय ते तपासावे लागेल,” अशी बोचरी टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
हे देखील पहा -
...म्हणजे १०५ हुतात्म्यांच्या भावनांना लाथ मारण्यासारखेच
“मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये राणे हे अती सूक्ष्म खात्याचे लघु उद्योगमंत्री आहेत. पंतप्रधान स्वतःला अत्यंत ‘नॉर्मल’ माणूस म्हणवून घेतात. ते स्वतःला फकीर किंवा प्रधानसेवक म्हणवून घेतात, हा त्यांचा विनम्र भाव आहे, पण राणे म्हणतात, ‘मी नॉर्मल नाही. त्यामुळे कोणताही गुन्हा केला तरी मी कायद्याच्या वर आहे.’ राणे व संस्कार यांचा संबंध कधीच नव्हता. त्यामुळे केंद्रीय मंत्रीपदाची झूल अंगावर चढवूनही राणे हे एखाद्या छपरी गँगस्टरसारखेच वागत-बोलत आहेत. भारतीय जनता पक्षाचा सध्या जो कायाकल्प सुरू आहे या नवनिर्मितीत राणे यांच्यासारख्यांना मानपान मिळत आहेत. म्हणूनच ‘नॉर्मल’ नसलेल्या राणेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ‘मारहाण’ करण्याची बेलगाम भाषा केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी ही भाषा वापरणे म्हणजे १०५ हुतात्म्यांच्या भावनांना लाथ मारण्यासारखेच आहे. राणे यांनी महाराष्ट्राला लाथ मारली व त्यांचे नवे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील राणेंच्या बेताल वक्तव्याचे समर्थन करीत आहेत. राणे यांना तसे बोलायचे नव्हते, अशी मखलाशी करू लागले आहेत. फडणवीस-पाटील यांच्या गळय़ात राणे नावाचा फाटका फुगा अडकला आहे. त्यामुळे सांगता येत नाही, सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. अशा वेळी संस्कारी राजकारणी महाराष्ट्राची माफी मागून मोकळे झाले असते. कारण महाराष्ट्राच्या अस्मितेपुढे कोणीही मोठे नाही, पण भाजपसाठी महाराष्ट्राची अस्मिता आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा हे गौण विषय आहेत.” असं या अग्रलेखात म्हटलं आहे.
भाजपवरही निशाणा
“महाराष्ट्रात सध्या भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा ‘जनआशीर्वाद’ नावाचा महामारीचा फेरा सुरू आहे, तो चेष्टेचाच विषय बनला आहे. एक मंत्री दानवे हे राहुल गांधींवर टीका करण्याच्या नादात मोदी यांनाच बैलाची उपमा देऊन गेले, तर दुसरे सूक्ष्म खात्याचे लघु उद्योगमंत्री शिवसेना व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर हवे तसे बरळत सुटले. महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमबाजी करीत ‘तुझा मुख्यमंत्री गेला उडत,’ अशी जाहीर वक्तव्यं करीत आहेत. ‘‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवू.’’ या भाषेत नारायण राणेंनी मुख्यमंत्री या संस्थेचा उद्धार केला आहे. मुख्यमंत्रीपद ही व्यक्ती नसून घटना व संसदीय लोकशाहीचे कवच असलेली संस्था आहे. तुम्ही व्यक्तीवर टीका करा. तुमच्या भुंकण्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही, पण राज्याचे नेतृत्व करणाणाऱ्या नेत्यावर शारीरिक हल्ला करण्याची भाषा करणारा माणूस महाराष्ट्राच्या मातीत निपजावा याची वेदना सगळय़ांना आहे. अशा उपटसुंभांना भारतीय जनता पक्षाने ‘मांडीवर’ घ्यावे हे त्यांच्या संस्काराचे अधःपतन आहे,” अशी टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
शिवसेनाद्वेषाचे तुणतुणे सुरूच आहे
“शरद पवार यांच्यासारख्या लोकमान्य नेत्यांवर खालच्या भाषेत टीका करणारे लोकही भाजपने उधारीवर घेतले आहेत व हे लोक पवारांवरही ऊठसूट हल्ले करीत आहेत. एका माकडाच्या हाती दारूची बाटली होतीच. आता दुसरे माकडही बाटली घेऊन उडय़ा मारीत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर शारीरिक हल्ला करण्याची भाषा केल्याने महाराष्ट्राच्या संयमाचा बांध तुटला आहे. या किरकोळ व्यक्तीस शिवसेनेने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचविले, सर्वोच्च पदे दिली, पण नंतर हे महाशय शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेले. शिवसेना सोडून २० वर्षांचा काळ उलटला तरी या महाशयांचे शिवसेनाद्वेषाचे तुणतुणे सुरूच आहे. या काळात त्यांनी सरडा लाजेल असे रंग बदलले. त्यांचे भांडवल एकच, ते म्हणजे शिवसेना व ठाकऱ्यांवर यथेच्छ चिखलफेक करणे. त्या चिखलफेकीचे ‘इनाम’ म्हणून महाशयांना सूक्ष्म उद्योगाचे मंत्रीपद भाजपने केंद्रात दिले आहे. ते खाते इतके सूक्ष्म आहे की, हाती लाल दिव्याच्या गाडीशिवाय काहीच लागलेले नाही. त्यामुळे शिवसेनेवर भुंकण्याचे जुनेच उद्योग त्यांनी सुरू ठेवले आहेत,” असा टोला सामनाच्या अग्रलेखामधून लगावण्यात आलाय.
केले तुका आणि झाले माका
“महाराष्ट्राचे राजकीय तसेच सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम भाजपने सुरू केले आहे. राणेंसारखे लोक आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून रोजच ठाकरे सरकार पडण्याच्या व पाडण्याच्या तारखा देत होते, पण सरकार दोन वर्षांचा कालखंड पूर्ण करीत आहे व संकटकाळातही सरकार लोकप्रिय ठरले आहे. देशातील पहिल्या पाच कार्यसम्राट मुख्यमंत्र्यांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यावेत याचा आनंद सगळय़ांनाच आहे, पण भाजपमधील उपरे आणि बाटगे काबूलमधील तालिबानी विकृतीप्रमाणे हाणामारीची भाषा करू लागले. शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या वल्गना हवेत विरत असताना कणकवलीच्या चारीमुंडय़ा चीत पुढाऱयांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा केली. हा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. भारतीय जनता पक्षाचे या बेताल वक्तव्यांवर नेमके काय म्हणणे आहे? नको त्या माणसाला सत्तेची दारू पाजल्याने कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते त्याचा अनुभव भाजपा सध्या घेत आहे. ‘केले तुका आणि झाले माका’ असेच त्यांचे दशावतार यानिमित्ताने झाले आहेत. केंद्रीय मंत्रिपदाची झूल पांघरूनही मूळ स्वभाव काही जाईना. आता भाजप नक्की काय करणार? की या वेळीही बगला वर करून नामानिराळे राहणार? महाराष्ट्राची सत्ता हातून निसटल्यापासून भाजपावाल्यांची डोकी कामातून गेली आहेत. त्यांचे आकांडतांडव सुरूच आहे. त्या आकांडतांडवाकडे जनता लक्ष देत नसल्यामुळे ‘महात्मा’ नारोबांसारखे भाडोत्री लोक शिवसेनेवर सोडले जात आहेत. या भाडोत्रींनी भाजपलाच नागडे करून सोडले व आता तोंड लपवून फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे,” अशा शब्दांमध्ये भाजापावर टीकास्त्र सोडण्यात आलंय.
महाराष्ट्रात आरती ओवाळायची काय?
“केंद्रीय मंत्री नारोबा राणे यांनी शपथग्रहण केल्यापासून जे दिवे पेटवले व अक्कल पाजळली त्यामुळे केंद्रीय सरकारची मान शरमेने खाली झुकली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मांडीस मांडी लावून बसणाऱया ‘महात्मा’ नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. राणे यांचा पूर्व इतिहास पाहता त्यांचे विधान मोदी-शहांनी गांभीर्याने घेतलेच पाहिजे. पंतप्रधानांच्या बाबतीत कुणी असे विधान केले असते तर त्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली एव्हाना तुरुंगात डांबलेच असते. नारोबा राणे यांचा गुन्हा त्याच पद्धतीचा आहे. महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे व एका मर्यादेपलीकडे ही बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही हे कृतीने दाखवून द्यायची हीच वेळ आहे. भारतीय जनता पक्षाला या बेताल बादशाहीची मोठी किंमत मोजावी लागेल. पंतप्रधान मोदी हा बेतालपणा सहन करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा करणारा कोणीही असो त्यांचे हात सध्या तरी कायदेशीर मार्गाने उखडलेलेच बरे! पंतप्रधान मोदींना मारण्याचा नुसता कट रचल्याच्या (?) आरोपाखाली काही विचारवंतांना फडणवीस सरकारने तुरुंगात सडवलेच आहे. इथे नारोबा राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचीच सुपारी घेतल्याचे दिसत आहे. आता सुपारीबाजांची महाराष्ट्रात आरती ओवाळायची काय?,” असा प्रश्न या लेखाच्या शेवटी विचारण्यात आला आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.