अकोला जिल्ह्यातील रुद्रायणी देवीचं मंदिर चौदावं शक्तीपीठ मानलं जातं.
प्रभू श्रीराम दोनदा येथे आल्याची आख्यायिका पुराणात आहे.
मंदिराच्या पायथ्याशी कमळतलाव असून ३५६ पायऱ्या आहेत.
नवरात्रात राज्यभरातील भक्त रुद्रायणी देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.
अक्षय गवळी, अकोला
आदिशक्ती दुर्गा म्हणजे मातृत्व आणि शक्तीचं प्रतिक आहे. पार्वतीचा अवतार समजल्या जाणाऱ्या दुर्गेची रूपं आणि नावंही अनेक. आहेत. आदीशक्तीची १०८ पीठं देशभरात आहेत. याच शक्ती पिठांच्या मांदियाळीतील चौदावं पीठ म्हणजे अकोला जिल्ह्यातील रुद्रायणी देवी. अकोल्यापासून ३० किलोमीटर अंतरावरील सिंदखेड गावाजवळील गडावर रुद्रयानी विराजमान आहे. या देवीच्या दर्शनासाठी प्रभू श्रीराम दोनवेळा येथे येवून गेल्याची आख्यायिका आहे.
नवरात्र आले की अकोलेकरांसोबतच राज्यभरातील भक्तांची पाऊले वळतात ती अकोला जिल्ह्यातील रुद्रयानीच्या दर्शनाला. अकोल्यापासून रुद्रायणी गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक बार्शीटाकळीमार्गे तर दुसरा पातुरमार्गे. रुद्रयाणी हे मंदिर चौदावं शक्तीपीठ मानण्यात येतं. या शक्तीपिठाच्या जन्मामागची एक आख्यायिका सांगितली जाते. महिषासुराचा वध केल्यानंतर आदिशक्तीने रुद्रावतार धारण केला होता. हा अवतार धारण केल्यानंतर आदिमाया येथे येवून बसल्याची आख्यायिका सांगितली जाते. 'त्रिपुरतापिनी' ग्रंथात रुद्रायनीच्या उत्पत्तीची माहिती देण्यात आली आहे.
रुद्रायणीच्या वास्तव्याने पावन झालेल्या या परिसरावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. या मंदिराचे एक वैशिष्ठ्य म्हणजे पायथ्याशी असलेला 'कमळतलाव', या तलावाचा आकार पायाच्या तळव्यासारखा आहे. त्याला पद्मातालाव म्हटलं जातं. या तलावात उगवणाऱ्या कमळफुलांनी देवीची पूजा केली जाते. रामायण काळात प्रभू श्रीराम येथे दोनवेळा येवून गेल्याचे दाखले पुराणात सापडतात. एकदा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तर एकदा वनवासात असताना प्रभू श्रीराम येथे सीतेसह येवून गेले. रामविजय ग्रंथातील पाचव्या, तिसाव्या आणि एकतिसाव्या अध्यायात प्रभू श्रीराम या ठिकाणी येवून गेल्याचा उल्लेख आहे. मात्र, याचा ठोस पुरावा कुणाकडेच नाही. वर्षातील ३६५ दिवस एवढ्याच ३५६ पायऱ्या मंदिराला आहेत. अजिंठ्याच्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या या देवीवर भक्तांची असीम श्रद्धा आहे..
या पौराणिक कथेसोबतच येथे देवीच्या सभामंडपासमोर असणाऱ्या समाधीबद्दल एक इतिहास सांगितला जातो. मुघलांशी युद्धानंतर भूमिगत झालेले रघुनाथ पेशवे या मंदिरात पुजारी म्हणून राहिल्याचे सांगितले जाते. मृत्यू नंतर येथेच देवीसमोर त्यांची समाधी उभारण्यात आली.मात्र याचा ठोस पुरावा कुणाकडेच नाही. रुद्रायणीच्या गडाच्या पायथ्याशी मोठी जत्रा थाटली आहे, तर लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आकाश पाळणासह विविध खेळ याठिकाणी आहे. अकोलेकरांची रुद्रायणीच्या दर्शनासाठी न चुकता इथं येत असतात. रुद्रायणी ही मातृत्वासोबतच शक्तीचे प्रतिक आहे. सिंदखेडची रुद्रायणीदेवी पुरानासोबतच इतिहासाचीही साक्षीदार आहे. या निसर्गसंपन्न तीर्थस्थळाला लोकाश्रयासोबातच राजाश्रय मिळणे तेवढेच आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.