
रामदास आठवले यांच्या पक्षात बुलढाणा जिल्हाध्यक्षपदाच्या बैठकीत जोरदार गोंधळ
बैठकीदरम्यान खुर्च्या, कुंड्या उचलून फेकण्यात आल्या
बुलढाणा पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना तेथून हटवलं
बैठकीनंतर पक्ष निरीक्षकांनी निर्णय राखून ठेवला
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक राजकीय पक्षांनी जिल्हा पातळीवरील नेतृत्वात फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठवले गटाने बुलढाण्यात बैठकीचं आयोजन केलं होतं. या आठवले गटाच्या बैठकीत बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावरून जोरदार राडा झाला. बुलढाण्यातील या कार्यकर्त्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आज मंगळवार 23 सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील विश्राम भवनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या पक्षनिरीक्षकासमोर तुफान हाणामारी झाली आहे. दोन्ही गटाच्या हाणामारीनंतर अखेर पोलिसांना पाचारण करून कार्यकर्त्यांना शांत करावे लागलं.
रिपाईं आठवले गटाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात स्थानिक विश्रामभवनावर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी पक्षाने संभाजीनगर येथून निरीक्षक म्हणून बाबुराव कदम आणि सुधाकर तायडे यांना पाठविले होते.
अध्यक्षपदासाठी शरद खरात, विजय मोरे,पठाण सर, राजू साबळे,सतीश बोर्डे,संजय वाकोडे आणि इतर काही जण इच्छुक होते. यापैकी काही इच्छुकांच्या समर्थकांनी बैठकीच्या ठिकाणी नारेबाजी सुरू केली. सुरुवातीला निरीक्षकासमोर आपली बाजू मांडताना हमरीतुमरी झाली. त्यानंतर दोन गट हाणामारीवर आले आणि एकमेकांवर तुटून पडले. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना तुफान मारहाण केली.
या हाणामारीत विश्रामगृहातील खुर्च्या, कुंड्या,उचलून भिरकावण्यात आल्याचे समजते. या घटनेचे माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विश्राम भवनातून कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. वातवरण शांत झाल्यावर पक्ष निरीक्षकांनी पुन्हा बैठक घेऊन सर्वांची मते ऐकून घेतली. बैठकीनंतर निर्णय राखून ठेवत आपल्या मार्गी परत निघून गेले. या बैठकीला गालबोट लावणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यावर पक्ष नेतृत्व काय कारवाई करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.