मुंबई : रायगडावरील (Raigad Fort) 'वाघ्या' श्वानाच्या स्मारकावरुन वाद उफाळण्याची शक्यता आहे. रायगडावरील या श्वानाच्या शिल्पासाठीचा बंदोबस्त हटवण्याची मागणी होत आहे. श्वानाचं स्मारक ऐतिहासिक नसल्याचं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटलं आहे.
शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) काळातील एकही पुरावा या श्वानासंदर्भात नाही. तसेच उत्तरकालिन बखरींमध्येही याबाबत नोंद नाही. त्यामुळे पुरातत्व विभागाने याबाबत पुरावे द्यावेत. अन्यथा हे शिल्प तातडीने येथून हटवावे. तसेच शिवप्रेमींच्या अस्मितेचं प्रतिक असलेल्या ठिकाणी असं ओंघळवाणं स्वरुप तयार केल्याबद्दल पुरातत्व विभागाने जाबही द्यावा, अशी मागणीही इंद्रजीत सावंत यांनी केली आहे.
रायगड किल्ल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या शेजारी जे श्वानाचं शिल्प उभं केलं आहे ते ऐतिहासिक नाही. या श्वानाचे कोणतेही पुरावे इतिहासात आढळत नाहीत. मग या श्वानाच्या शिल्पाला पोलीस बंदोबस्त का दिला जात आहे? असा सवाल इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)
संरक्षण दिलं जातंय ठिक आहे पण ऐतिहासिक वास्तूमध्ये पोलीस कायमस्वरुपी वास्तव्यास कसे असू शकतात. किल्ल्यावर प्लास्टिकच्या टाक्या, कपडे वाळत घालण्यासाठी दोऱ्या, इलेक्ट्रिक वायर्स दिसत आहेत. त्यामुळे हा पोलिस बंदोबस्तही हटवला गेला पाहिजे, अशी मागणी इंद्रजित सावंत यांनी केली आहे.
आमचे सहकारी याबाबत पुरातत्व खात्यात माहिती अधिकारात माहिती मागवत आहेत. याआधीही मागवलेल्या माहितीत, स्मारकांच्या लिस्टमध्ये या श्वानाचं स्मारक नाही. तसेच याबाबत कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत, अशी माहिती पुरातत्व विभागने आम्हाला दिली आहे. त्यामुळे योग्य वेळी आम्ही याबाबत न्यायालयातही जाऊ असा इशाराही इंद्रजित सावंत यांनी दिला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.