Ranjangaon Mahaganpati: ग्रीष्मातील वाढती उष्णता लक्षात घेता १ मे रोजी रांजणगाव (ता. शिरूर) येथील महागणपतीला पारंपारिक पद्धतीने चंदन उटीचा लेप लावण्यात आला. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महागणपती मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी महागणपतीला एक हजार एक चिकूंचा नैवेद्य दाखविण्यात आला.
मे महिना हा तीव्र उन्हाचा समजला जातो. या महिन्याच्या सुरवातीलाच महागणपती मूर्तीची दाहकता कमी व्हावी यासाठी पारंपारिक पद्धतीने मृदू, पवित्र चंदन उटी केली जाते. आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून मुख्य गाभाऱ्यात रंगीबेरंगी व सुगंधी फुलांची सजावट करण्यात आली होती.
पहाटे साडेपाचच्या सुमारास अभिषेक घातल्यानंतर, श्रीं च्या मूर्तीला मंत्रोच्चाराच्या घोषात विधीवत चंदन उटीचा लेप लावण्यात आला. गणेश भक्त सुरेंद्र वधवा यांना चंदन उटीचा मान मिळाला. दुपारी बारा वाजता रांजणगाव गणपती (Mahaganpati) देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर महागणपतीला एक हजार एक चिक्कूंचा महानैवेद्य करण्यात आला.
उद्योजक सचिन दुंडे यांनी नैवेद्याची फळे महागणपतीला अर्पण केली. रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांच्या हस्ते या मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देवस्थान चे उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय पाचुंदकर, पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. सायंकाळच्या आरतीनंतर, गणेशभक्तांना चिकूचा प्रसाद वाटण्यात आला. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.