Rajya Sabha Election: ...तर MIMची २ मते महाविकास आघाडीच्या पारड्यात?

राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, अपक्ष आमदारांच्या मताला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.
Rajya Sabha Election MIM Mahavikas Aghadi
Rajya Sabha Election MIM Mahavikas Aghadi SAAM TV
Published On

औरंगाबाद: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. शिवसेना आणि भाजपसाठी ही राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. राज्यसभेच्या चार जागा महाविकास आघाडीच जिंकणार, असा दावा नेत्यांकडून केला जात असून, भाजपनेही कंबर कसली आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच अपक्ष आमदारांच्या एकेक मताला महत्व प्राप्त झालं आहे. अपक्ष आमदारांची मते मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून 'फिल्डिंग' लावली जात आहे. अशात आता एमआयएमची दोन मते महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पारड्यात पडतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच संकेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी दिले आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) एमआयएमची दोन मते महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर आपली नाराजी व्यक्त करणार आहेत आणि आमदार निधी वाटपाबाबत, मुस्लीम समाजाच्या विकासाच्या मुद्द्यांबाबत चर्चा करणार आहेत. त्यात जर महाविकास आघाडीने मान्य केले तर, विचार केला जाऊ शकतो, असे जलील म्हणाले.

ते म्हणाले, 'राज्यसभेत कुणाला मदत करायची, हा निर्णय आमच्या पक्षाचे अध्यक्ष खासदार अससुद्दीन ओवेसी हेच घेणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडीकडून आमदारांना निधी वाटप करताना प्रचंड भेदभाव केला जातो आहे. सत्ताधारी आमदारांना जास्त आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी असा प्रकार गेल्या अडीच वर्षांत बघायला मिळाला. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे नाराजी व्यक्त करणार आहोत.'

याशिवाय आमच्या मागण्यादेखील त्यांच्यासमोर मांडणार आहोत. यावर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली तर, राज्यसभेसाठी महाविकास आघाडीला मतदान करायचे का ? याचा विचार आम्ही करू, असे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसांत निर्णय

येत्या दोन दिवसांत याबाबतचा निर्णय जाहीर केला जाऊ शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 'एमआयएम' भाजपची बी टीम असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामावर देखील एमआयएम समाधानी नाहीत. अशावेळी राज्यसभेच्या निवडणुकीत ते कोणत्या पक्षाला मतदान करणार, हे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी गोळाबेरीज करताना एमआयएमच्या मतांचा देखील विचार करावा लागणार आहे. तर भाजपचा डोळा देखील त्यावर असणार आहे. अशावेळी एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  एमआयएम पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातील लग्नकार्यासाठी ओवेसी आज नांदेडमध्ये येणार आहेत, तर उद्या त्यांची लातूरमध्ये सभा होणार आहे. या दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, यावर देखील चर्चा होणार आहे, असे समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com