मुंबई : अतिशय रंगतदार झालेल्या राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022), सहाव्या जागेवर विजय मिळवत भाजपने शिवसेनेला बॅकफुटवर ढकललं. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव करत भाजप (BJP) उमेदवार धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे निवडणुकीत भाजपने तिन्ही उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही अपक्ष आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं. दरम्यान, भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देत शिवसेनेसह संजय राऊतांना (Sanjay Raut) डिवचलं आहे.
राज्यसभेत तिन्ही उमेदवारांचा विजय झाल्यानंतर भाजपने विधान भवनाच्या पायऱ्यांवर मोठा जल्लोष केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला हाणला. आमचे तिसरे उमेदवार हे शिवसेनेच्या प्रथम क्रमांकाच्या उमेदवारापेक्षाही जास्त मतांनी विजयी झाले, असा टोला फडणवीसांनी लगावला.
विजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला मतदान करणाऱ्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. हा विजय महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो. जे स्वतःला महाराष्ट्र, मुंबई समजतात. त्यांना या विजयाने लक्षात आणून दिले. महाराष्ट्र म्हणजे १२ कोटी जनता, मुंबई म्हणजे मुंबईतील जनता आणि मराठी म्हणजे आम्ही सगळे आहोत, हे दाखवून दिले आहे. विजयाची मालिका सुरू झाली आहे.'
"सगळ्यात महत्वाची गोष्टी अशी की आमचे जे तिसरे उमेदवार निवडून आले, त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजे संजय राऊतांपेक्षाही जास्त मतं घेतलं आहे. आमचे पियुषजी 48 मतांनी निवडून आले, आमचे डॉ. बोंडे यांनाही तेवढीच मतं मिळाली. तर आमच्या धनंजय महाडिकांना 41 पाईंट 56 मतं मिळाली आहेत. जी शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
राज्यसभेच्या ६ जागांसाठीचं काल (शुक्रवारी) मतदान पार पडलं. या निवडणुकीचा निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. यात भाजपने दिलेला तिसरा उमेदवार निवडून आला असून शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले. तर धनंजय महाडीक हे विजयी झाल्याने भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरल्याचे मानले जाते.
दुसरीकडे, सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. "भाजपने नक्कीच सहावी जागा जिंकली. त्यांचा विजय झाला असं मी मानत नाही. पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते ही संजय पवार यांना मिळाली. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत महाडीकांचा विजय झाला. मोठा विजय झाला ते चित्र निर्माण केलं पण तसं काही नाही. दोन-चार मतांची घासाघीस झाली. सगळ्या प्रमुख नेत्यांनी संजय पवारांची जागा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पहिल्या पसंतीच्या मतांचा विचार झाला तर आम्ही जवळजवळ जिंकलो होतो. ही अतिशय किचकट प्रक्रिया आहे. पण तरीही त्यांचे अभिनंदन". असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.