
Raigad Guardian Minister Rada : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आले. महायुतीमध्ये रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले. पण त्यामुळे शिवसेनेत मात्र धूसफूस सुरू झाली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेनेचे भरत गोगोवाले इच्छूक होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. पण यावेळीही त्यांना पालकमंत्रिपदाने हुलकावणी दिली. पालकमंत्रिपदावरून शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. रायगडमधील काही शिवसैनिकांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे शिंदेंसमोर नवा पेच निर्माण झालाय.
शनिवारी महायुतीच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाली. रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आले. भरत गोगावले यांच्या पदरी पुन्हा निराशा आली. त्यामुळे रायगडमधील गोगावले समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मुंबई-गोवा महामार्ग अडवण्यात आला. रास्तारोको करत आपला राग आणि नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी रायगडमधील शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.
भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले. तब्बल ३८ पदाधिकाऱ्यांनी राजीनामाअस्त्र उगारले आहे. रायगडमधील शिवसेनेच्या विविध ३८ पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री व सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे. रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला दिल्याने निषेध व्यक्त केला. भरत गोगावले यांना डावलल्याने रायगड शिवसेनेत मोठी नाराजी आहे. त्याचेच पडसाद पडताना दिसत आहे.
संपर्क प्रमुख, सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, महिला जिल्हा प्रमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख, जिल्हा समन्वयक, महाड, कळा, पोलादपूर, रोहा,माणगाव येथील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा शिंदेंकडे पाठवला आहे. इतकेच नाही तर विधानसभा प्रमुख राजू देशमुख यांनाही नाराजी व्यक्त करत आपला राजीनामा शिंदेंकडे पाठवला आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होता. राष्ट्रवादीच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यात थेट स्पर्धा होती. पुन्हा एकदा अदिती तटकरे यांनी बाजी मारली. पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे भरत गोगावले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
भरत गोगावले काय म्हणाले ?
रायगडच्या पालकमंत्रिपदावरील निर्णय धक्कादायक आहे, ही अपेक्षा नव्हती, अशी नाराजी मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्रिपदाबाबद दिग्गजांसोबत अज्याप चर्चा झालेली नाही. रायगडमधील सहा आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून जिल्ह्यातील वातावरणाबाबत माहिती दिली होती. आत्ता जो निकाल आहे तो अनपेक्षीत आहे आणि मनाला पटणारा नाही, असे गोगावले म्हणाले. परंतु आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, असे सांगायलाही गोगावले विसरले नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.