सचिन बनसोडे, राहाता / अहमदनगर
Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar Autobiography : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं 'लोक माझे सांगाती' भाग 2 या आत्मचरित्राचे प्रकाशन आज झाले. या पुस्तकात महाविकास आघाडी, शिवसेना, उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, 'आत्मचरित्रात काय लिहलंय मला माहीत नाही. पहाटेचा शपथविधी कुणाच्या आशिर्वादाने झाला..? महाराष्ट्रातील जनतेला सांगण्याची गरज नाही.'
राष्ट्रवादीचा कोणताही निर्णय त्यांच्या (शरद पवार) संमतीशिवाय होऊ शकत नाही. लोकांमध्ये विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यांनी काय लिहलंय यात मला स्वारस्य नाही, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राऊतांनी आमच्या नजरेची चिंता करू नये. आमची नजर तुमच्यावर पडली तर, मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल, याचा तुम्हाला अंदाज नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
संजय राऊत हे बेताल विधाने रोज करत असतात. मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी करावी लागेल. त्यांच्यासह अनेकांच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील, असाही इशारा त्यांनी दिला.
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर विखे पाटील यांनी टोलेबाजी केली. कौन बनेगा मुख्यमंत्री हा विनोदाचा विषय झालाय. राज्यातील जनतेचे मनोरंजन सुरू आहे. आघाडीची वज्रमूठ राज्याच्या हितासाठी नाही. विश्वासघाताने ही मंडळी सत्तेवर आली होती. जनाधार नसताना सत्ता काबीज केली होती, असा आरोपही त्यांनी केला.
अडीच वर्षात आघाडीने महाराष्ट्राला काय दिलं? असा सवाल करतानाच, केवळ आपले पाप झाकण्यासाठी केलेली वज्रमूठ आहे. या वज्रमुठीत यांचे पाप आणि भ्रष्टाचार असून, ही मूठ उघडली तर आपल्या पापाचा पाढा वाचला जाईल याची भीती आहे. भीतीपोटी आणि पाप झाकण्यासाठी झालेली ही आघाडीची वज्रमूठ आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली.
सत्ता गेल्यामुळे वैफल्यातून उद्धव ठाकरे वक्तव्ये करत आहेत. परिस्थितीचे भान विसरून वक्तव्य करताहेत. काँग्रेसने पदोपदी सावरकरांचा अपमान केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय. हे तुमचं कोणतं हिंदुत्व आहे? असा सवालही त्यांनी केला. तुमचं हिंदुत्व केवळ सत्ता मिळवण्यासाठी आहे. सत्तेसाठी तुम्ही लाचार झाले आहात. पुन्हा-पुन्हा तुम्हाला हिंदुत्व सांगण्याची वेळ का येतेय?, असा सवाल उपस्थित करून विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.