
पुणे : राज्याला हादरवणाऱ्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेच्या तब्बल ४० तासांनंतर मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. दत्ता गाडेच्या गुनाट गावातूनच ग्रामस्थांच्या मदतीने दत्ता गाडेला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र, गाडेला पकडण्यासाठी पोलिसांनी १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. गाडेच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी गुनाट ग्रामस्थांचे आभार मानले.
२५ फेब्रुवारीच्या पहाटे साडे पाचच्या सुमारास स्वारगेट एसटी डेपोतील शिवशाही बसमध्ये दत्तात्रय गाडेने २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार केले. त्यानंतर तो फरार झाला. गाडे शिरुरमधील त्याच्या मूळगावी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा गुणाट गावी पोहोचला. अखेर २८ फेब्रुवारी मध्यरात्री दीड वाजता गाडेला बेड्या ठोकण्यात आल्या.
गाडेच्या अटकेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांनी गुनाट ग्रामस्थांचे आभार मानले. गाडेच्या ठावठिकाण्याबद्दलची शेवटची टिप देणाऱ्या ग्रामस्थाला १ लाख रुपये देण्यात येतील, असं कुमार यांनी सांगितलं. मात्र, या घोषणेनंतर ग्रामस्थांमध्ये वाद पेटला. आपणच गाडेला पकडून दिल्याचा दावा गावातील अनेकांनी केला. आपणच पोलिसांना दिलेल्या टिपने दत्ता गाडे सापडला, असंही अनेकांनी सांगितलं.
ग्रामस्थांमधील वाद टोकाला जात असल्याचं लक्षात येताच गुनाट गावते सरपंच रामदास काकडे पुढे आले. त्यांनी या सगळ्यावर तोडगा काढला. पोलिसांनी जाहीर केलेलं बक्षीस ग्रामस्थ नाकारतील, असं काकडे म्हणाले. पोलिसांनी जाहीर केलेल्या बक्षिसामुळे अनेकजण त्यांनीच गाडेला पकडलं किंवा त्यांनी दिलेल्या माहितीमुळेच गाडे पकडला गेला, असा दावा करत आहेत. या तिढा सोडवण्यासाठी आम्ही एक बैठक घेऊ. आम्हाला बक्षिसातला एक रुपयाही नको, अशी भूमिका बैठकीत घेण्यात येईल, असं सरपंचांनी सांगितलं.
दरम्यान, दत्तात्रय गाडेला पकडून देण्यात सहभाग असलेल्या ग्रामस्थांशी आम्ही बोललो आहोत. त्यांनी देखील याला सहमती दर्शवली आहे. या सगळ्या घटनेमुळे गावाची बदनामी झाली. अशा प्रकरणात गावाचं नाव येणं ही काही अभिमानाची बाब नाही. आम्ही बक्षीस नाकारणार आहोत, अशी भूमिका काकडेंनी मांडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.