पतंजलीच्या जाहिरातप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. कोर्टाने निर्देश देऊनही जाहिराती न थांबवल्याबाबत कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच जाहीर माफी मागा असं सांगत कोर्टात हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोर्टाच्या आदेशानंतर आज बाबा रामदेव आणि अचार्य बालकृष्णन सुप्रीम कोर्टात पोहोचले होते.
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होताच बाबा रामदेव यांनी कोर्टाची माफी मागितली. केवळ सर्वोच्च न्यायालयच नाही तर देशातील कोणत्याही न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होता कामा नये, असं न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी म्हटलं.
तुमच्या बाजूने आश्वासन देण्यात आले आणि नंतर त्याचे उल्लंघन करण्यात आले. देशातील सर्वात मोठ्या न्यायालयाचा हा अपमान आहे.आता तुम्ही माफी मागत आहात हे आम्हाला मान्य नाही.न्यायालयाच्या आदेशाचं तुम्हाला गांभीर्य नाही. न्यायालयाचे आदेश असे हलक्यात घेता येणार नाहीत, असं म्हणत कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
आम्हाला माफी मान्य नाही, आम्ही अवमानाची कारवाई करू. आपण काय केले आहे याची आपल्याला कल्पना नाही. तुम्ही गंभीर विषयांची खिल्ली उडवली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने काय परिणाम होतात हे तुम्हाला समजल पाहिजे, असं अशा शब्दात कोर्टाने बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णन यांना झापलं आहे.
नेमकं काय प्रकरण?
इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या काही जाहिरातींवर अक्षेप घेतला होता. तसेच या जाहिरातींवरून त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. प्रत्येक फसव्या जाहिरातीमागे एक कोटी रुपयांचा दंड घेतला जाईल असा इशारा यापूर्वीच कोर्टाने दिला होता. मात्र तरीही जाहिराती थांबल्या नव्हत्या.
कोर्टाने निर्देश देऊनही जाहिराती न थांबल्यामुळे कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच जाहीर माफी मागा असं सांगत कोर्टात हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. २७ फेब्रुवारी रोजी देखील यावर एक सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने पतंजलीच्या सर्व जाहिराती इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियावरून बंद करण्यास सांगितले होते. ज्या प्रोडक्टची जाहिरात केली जात आहे, त्यात खोटे दावे केले जात आहेत. त्यामुळे या जाहिराती बंद कराव्यात, असं न्यायालयाने म्हटलं होतं. मात्र आता तसे न झाल्याने पुढे काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.