Pandharpur Vitthal Mandir News: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्यास आज राज्य सरकारने अंतिम मंजूरी दिली आहे. मंदिर विकास आराखड्यासाठी ७३ कोटी ८५ लाख ९५ हजार रूपये मंजूर केले आहेत. या निधीमुळे मंदिराचे प्राचीन सौंदर्य उजळून निघण्यास मदत होणार आहे. तसेच मंदिराचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.
तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी १९ जुलै २०१६ च्या शासन निर्णयातील आराखड्याची कमाल किंमत मर्यादा २५ कोटी ही अट शिथिल करून पंढरपूर देवस्थान मंदिर विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. पंढरपूर (Pandharpur) देवस्थान मंदिर विकास आराखड्याअंतर्गत कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांना संनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
आराखड्यात प्रस्तावित असलेली कामे दोन टप्प्यात ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पंढरपूर देवस्थान मंदिर विकास आराखडा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी आवश्यक परवानगी घेणे, कामांना तांत्रिक मान्यता घेणे, कामांकरता निधी वितरण करणे आणि आराखड्याशी संबंधित शासनास सादर करायची विवरणपत्रे याची जबाबदारीही जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.
मंदिर विकास आराखड्यामध्ये मुख्य मंदिर व संकुलातील मंदिराचे जतन संवर्धन यामध्ये मुख्य विठ्ठल मंदिर (गर्भगृह, चारखांबी, सोळखांबी अर्ध मंडप इ.) साठी ५ कोटी ३ लाख ५८ हजार , रुक्मिणी मंदिर २ कोटी ७० लाख ५३ हजार, नामदेव पायरी व त्यावरील इमारतीचे नूतनीकरण ५ कोटी ५ लाख ५१ हजार ९७४ रुपये, महाद्वार व दोन्ही बाजूच्या पडसाळी ६ कोटी १८ लाख २३ हजार , लाकडी सभामंडप १ कोटी २५ लाख ७२१ रुपये, महालक्ष्मी मंदिर, व्यंकटेश मंदिर व मंदिरातील इतर इमारती (बाजीराव पडसाळ, पश्चिम दरवाजा, तसेच मंदिरातील ३८ परिवार देवता, काशीविश्वेश्वर, शनेश्वर, खंडोबा, गणपती, राम मंदिर वगैरे) साठी ३ कोटी ६९ लाख ७ हजार आणि मंदिरातील दीपमालासाठी २२ लाख २७ हजार.
देवस्थान अखत्यारीतील मुख्य मंदिर समूहाच्या बाहेरील २८ परिवार देवतांच्या मंदिरांचे जतन व संवर्धनासाठी ११ कोटी २७ लाखाची तरतूद केली आहे. याबरोबरच विद्युत व्यवस्थापन (आधीची विद्युत प्रणाली बदलून नवीन प्रणाली बसविणे, आपत्कालिन विद्युत पुरवठा, वायुवीजन तसेच आतील व बाहेरील भागातील दररोजची व उत्सवी प्रकाश योजना) साठी ५ कोटी ६७ लाख ११ हजार ९८० रुपयांची मंजूरी देण्यात आली आहे.
तर जल व्यवस्थापनासाठी (पिण्याच्या तसेच वापराच्या पाण्याची व्यवस्था तसेच सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याची निचरा व्यवस्था) १ कोटी ५४ लाख ८ हजार, अभ्यागत सुविधेसाठी ६ कोटी ६८ लाख ९८ हजार ८७७ रुपये आणि मंदिरालगतच्या रस्त्याची दगडी फरसबंदी आणि सौंदर्यीकरण यासाठी ४ कोटी २० लाख ७२ हजार ९६० रुपयांचा समावेश आहे. तर जीएसटी सह अन्य करांसाठी २० कोटी ३३ लाख ८१ हजाराची तरतूद केली आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.