एकनाथ शिंदे यांच्यासह एकसंघ शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केल्यानंतर तत्कालिन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुढे शिंदेंनी भाजपशी हातमिळवणी करत राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केलं. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट संघर्ष रंगलाय. सध्या दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीकेचा भडिमार करत आहेत.
अशातच पंढरपूर (Pandharpur News) येथील भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी महाविकास आघाडी बाबत मोठा दावा केला आहे. मी विधानसभेवर निवडून गेल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं आणि राज्यात महायुतीचे सरकार आलं. माझ्या आणि पंढरपूर मतदारसंघाच्या पाय गुणामुळे हे घडले, असं समाधान आवताडे यांनी म्हटलंय.
आमदार आवताडे यांनी मंगळवारी पंढरपुरात महिला मेळावा घेतला. या मेळाव्याला हजारो महिलांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी महाविकास आघाडीबाबत (Mahavikas Aaghadi) मोठा दावा केला. मी विधानसभेवर निवडून गेल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून गेलं, असं आवताडे म्हणाले.
इतकंच नाही, तर पंढरपूर मतदारसंघाचा पायगुण इतका मोठा होता की, तुम्ही मला निवडून दिलेल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुतीचे आपलं सरकार आले. महायुतीचे सरकार आल्यानंतर शेतकरी, महिला, मजूर यांच्या मागे हे सरकार खंबीरपणे उभा आहे, असंही आवडते यांनी म्हटलंय. त्यांच्या या दाव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
समाधान आवताडे हे भाजपचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून तर 2019 साली अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती. परंतु या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला होता. 2021 मध्ये पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं निधन झाल्यानंतर आवताडे यांनी भाजपच्या तिकीटावर पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक लढवली. यामध्ये ते विजयी झाले होते.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.