जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर धनगर आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही उपोषण सोडलं आहे. वडीगोद्री येथे ओबीसी महिला आणि मुलींच्या हाताने पाणी घेऊन हाकेंनी उपोषण सोडलं आहे. उपोषणाच्या ७ व्या दिवशी हाकेंनी उपोषण सोडलं.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आरक्षण सुरु केलं. त्यानंतर काही दिवसांत वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे देखील उपोषणाला बसले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी हक्काच्या संरक्षणासाठी हाकेंनी जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला सुरुवात केली होती. लक्ष्मण हाके यांनी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. अनेक नेत्यांकडून त्यांनी उपोषण सोडावं, यासाठी प्रयत्न केले जात होते.
ओबीसींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषणाचा मार्ग निवडला होता. गेल्या ७ दिवसांपासून त्यांचं वडीगोद्री येथे उपोषण सुरु होतं. मात्र, आज बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सोडलं. यावेळी आंतरवाली सराटीतून शेकडो महिला लक्ष्मण हाके यांच्या भेटीला आल्या होत्या. उपोषण सोडल्यानंतर लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावली आहे. आता पुढील उपचारासाठी रुग्णालयाने जालन्याला रवाना करण्यात आलं आहे.