Happy New Year : २०२४ वर्षाला निरोप देत २०२५ या नववर्षाला सुरवात झाली आहे. अनेकांनी रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करत नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले. परंतु काही जणांनी नववर्षाची सुरवात देवदर्शनाने करण्याच्या उद्देशाने राज्यातील तीर्थस्थळी जाणे पसंत केले. यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंढरपूर, तुळजापूर, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी गड, शिर्डीचे साईबाबा मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली असल्याचे पाहण्यास मिळाले आहे.
साई नामाच्या जयघोषाने दुमदुमली साईनगरी
शिर्डी (अहिल्यानगर) : देश विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईनगरी भक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहे. नववर्षाची सुरूवात साई दर्शनाने करण्यासाठी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. नववर्षाच्या स्वागताचा मोठा उत्साह शिर्डीत बघायला मिळत असून साईनामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदूमून गेली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी दीड किलोमीटरपर्यंत रांग
नाशिक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्रंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळेच मंदिराच्या बाहेर एक ते दीड किलोमीटर पर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. तर चार ते पाच तास रांगेत उभे राहून दर्शनाला लागत आहे. नवीन वर्षाचे पहिले दिवशी भारताच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक नाशिकमध्ये दाखल झाले असून सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी पर्यटनाबरोबरच मंदिरात दर्शनाचा योग जुळून आणला आहे. त्यामुळे सर्व पर्यटन स्थळ आणि देवस्थानंवर मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळत आहे.
विठुरायाला पाच हजार संत्र्यांचा नैवद्य
पंढरपूर : नवीन वर्षाच्या निमित्ताने विठुरायाला पाच हजार संत्र्यांचा महानैवद्य दाखवण्यात आला आहे. पुणे येथील भाविक प्रदीप सिंह ठाकुर यांच्यावतीने विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यात संत्र्यांची व पानाफुलांची आरास केली आहे. यामध्ये सुमारे पाच हजार संत्र्यांचा आणि तीनशे किलो विविध पाना फुलांचा वापर केला आहे. संत्र्यांची आरास केल्याने देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. इतकेच नाही तर विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
सप्तशृंगगडावर भाविकांची गर्दी
नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपिठ असलेल्या नाशिकच्या श्री. क्षेत्र सप्तशृंग गडावर भाविकांनी आज गर्दी केली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य व परराज्यातील भाविकांनी सप्तशृंग गडावर कालपासून हजेरी लावली होती. भाविकांची गर्दी पाहता आदिमायेच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवले आहे. नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी; या उद्देशाने आदिमायेचे दर्शन घेवून नव्या वर्षाची सुरुवात केली. पहाटे पासून भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अनेकांनी आदिमायेचे दर्शन घेत नववर्षाचे संकल्प करत येणारे वर्ष सुखाने आनंदाने जावो, संकटे दूर व्हावे अशी देवी चरणी प्रार्थना केली.
तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सव
नविन वर्षाच्या निमित्ताने हजारो भाविकांनी आज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. दरम्यान गेली आठ ते दहा दिवसापासून तुळजापूरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र रात्रीपासुन तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सव पुर्वीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली आहे. त्यामुळे भाविकांची गर्दी देखील काही प्रमाणात घटली असुन ७ जानेवारीला तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपवुन सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार त्यामुळे पुन्हा भाविकांची गर्दी वाढणार आहे.
जेजुरी गडावर भाविकांची गर्दी
बारामती : नव वर्षाच्या पहिल्या दिवशी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला काल जेजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले होते. आज सकाळपासूनच नव वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.