तबरेज शेख, प्रतिनिधी
नाशिक शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून ड्रग्ज बनविणारा कारखानाच उध्वस्त केला आहे. या कारवाईनंतर मोठे ड्रग्ज रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज माफिया ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातुन पोलिसांच्या हाती तुरी देऊन फरार झाला होता. या प्रकरणानंतर ड्रग्ज विरोधी कारवाईसाठी पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर साकीनाका पोलिसांनी नाशिक शहर पोलीस हद्दीत मोठी कारवाई करत दीडशेहुन अधिक किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. नाशिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून श्री. गणेशाय इंडस्ट्रीज या कंपनीत ड्रग्ज निर्मिती सुरू होती. ड्रग्स माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील नाशिकच्या शिंदे पळसे परिसरात हा ड्रग्सचा कारखाना चालवत होता. याबाबत माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी कारवाई करत कारखानाच उध्वस्त केला आहे.
तब्बल तीन दिवस सुरू असलेल्या या कारवाईनंतर पोलिसांनी कंपनी मालकासह कामगारांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, राज्यातील ड्रग्जचं मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच नाशिक पोलिसांनीही शहरातील वडाळागाव भागातील सादिकनगरमध्ये छापा टाकून ड्रग्स विकणाऱ्या एका महिलेसह आणखी एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल २ लाखांचं ५४.५ ग्रॅम एम. डी. ड्रग्स आणि गांजाचा साठा जप्त केला आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.