Maratha vs OBC : नाशिकमध्ये मध्यरात्री तुफान राडा, शिवसृष्टीत जरांगे-भुजबळ समर्थक भिडले; पाहा VIDEO
Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal : नाशिकच्या येवला येथे रविवारी रात्री मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार घोषणबाजी करण्यात आली. वाद इतका विकोपाला गेला की, कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.
यावेळी छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी मनोज जरांगेविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप जरांगे समर्थकांनी केला. जोपर्यंत छगन भुजबळ माफी मागत नाही. तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत जरांगे समर्थकांनी महामार्गावरच ठिय्या मांडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे रविवारी एका कार्यक्रमानिमित्त येवल्यात आले होते.
परत जाताना त्यांनी नुकत्याच उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीला भेट दिली. यावेळी मंत्री छनग भुजबळ यांचे समर्थक देखील याच ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान, मनोज जरांगे पाटील या परिसरात दाखल होताच दोन्ही गटातील समर्थकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की देखील केली.
भुजबळ यांच्या समर्थकांनी मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेले बॅनर्स फाडले. तसेच त्यांना शिवीगाळ देखील केली, असा आरोप जरांगे समर्थकांनी केला. दुसरीकडे, मनोज जरांगे यांच्याच समर्थकांनी राडा घातल्याचा आरोप भुजबळ समर्थकांनी केला. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
"मी तुम्हाला न्याय देण्यासाठी खंबीर असून तुम्ही शांतता ठेवा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना केलं. आपला समाज एक झाला असून आपल्याला न्यायाकडे जायचं आहे. त्यांची चूक असेल तरीही जाऊ द्या. आपल्याला राज्यात शांतता ठेवायची आहे. आपण मोठा भाऊ आहोत सर्व सोडून द्यायचे आहे. रस्ता मोकळा करा पोलिसांना सहकार्य करा. लहान मोठा भाऊ समजून सर्व सोडून द्या", असं म्हणत जरांगे यांनी आपल्या समर्थकांची समजूत काढली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.