
नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे हसनाळ गाव पाण्याखाली गेले आहे.
लेंडी धरणातून पाणी सोडल्याने संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले.
या पूरामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. अनेक जनावरे वाहून गेली.
SDRF आणि आर्मीच्या जवानांकडून मदतकार्य केले जात आहे.
नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे. पावसामुळे नांदेडमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ गावावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आणि लेंडी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे हसनाळ गावाला पाण्याने वेढा घातला आहे.
या गावात आता एकही घर शिल्लक राहिले नाही. संपूर्ण घरं जमीनदोस्त झाली आहेत. जवळपास ३०० लोक या गावात अडकले होते. काल एसडीआरएफच्या जवानांनी बचाव कार्य युद्धपातळीवर राबवून या लोकांना गावातून बाहेर काढले. पण या पुरामुळे गावातील ५ जणांचा मृत्यू झाला. या पाचही जणांचे मृतदेह सापडले आहेत.
सध्या हसनाळ गावात मदत कार्यासाठी आर्मीचे पथक दाखल झाले असून सकाळपासूनच या गावाच्या परिसरात आर्मीने मेडिकल कॅम्प आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. परंतु पावसाचा जोर अजून देखील कायम आहे. त्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान गावकरी आपल्या घरातील साहित्य शोधून बाहेर काढताना दिसत आहेत.
धरणातील पाणी सोडणार नाही असे आश्वासन या गावकऱ्यांना पाटबंधारे विभागाने दिले होते, असा दावा गावकरी करीत आहेत. परंतू अचानक लेंडी धरणातून पाणी सोडल्यामुळे हसणारी गावात पाणी शिरले असल्याचे गावकरी सांगत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी देखील गावकरी करत आहेत.
'सरकार गोरगरिबांसाठी असतं, गोरगरीब सरकारसाठी असतं, सरकार पाणी सोड ना म्हटलं, परंतू लेंडी धरणातून अचानक पाणी सोडलं. सगळं गाव या पुराच्या पाण्यात गाडलं गेलं. कालपासून पोटात अन्नाचा कण नाही. शेत गेलं घर गेलं सगळं या पुराच्या पाण्यात गेलं.', असं म्हणत एका महिला गावकऱ्याने आक्रोश करत आपली व्यथा मांडली. पूरामुळे हसनाळ गावाकऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहे. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले, अशी अवस्था त्यांची झाली आहे. सरकारने तातडीने मदत करावी अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.