Nanded Flood : वर्षांनंतरही 'त्या' रात्रीची धडधड कायम! नांदेडच्या हसनाळ गावात १८ ऑगस्ट २०२५ ला नक्की काय घडलं होतं?

Nanded Hasnanal Flood : १८ ऑगस्ट २०२५ रोजी लेंडी नदीच्या पुरामुळे नांदेडच्या हसनाळ गावावर काळरात्र ओढावली. पाच जणांचा मृत्यू झाला, शेकडो नागरिकांनी जीव वाचवला; मात्र वर्षभरानंतरही पुनर्वसन आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम आहे.
Nanded Hasnanal Flood
Nanded Hasnanal Flood
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड

नांदेडच्या मुखेड तालुक्यातील अनेक गावांना १८ ऑगस्ट २०२५ रोजी लेंडी नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला होता. मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या पाठीमागील (बॅकवॉटर) पाण्यामुळे संपूर्ण हसनाळ गाव पाण्याखाली गेले होते. या दुर्दैवी घटनेत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. हसनाळ, रावणगाव, भिंगोली, भेंडेगाव, भासवाडी यांसह एकूण ११ गावांमध्ये लेंडी नदीचे पाणी शिरले होते. १८ ऑगस्ट २०२५ रोजी घडलेल्या या भीषण घटनेला आज १ वर्ष पूर्ण झाले आहे. यावर साम टीव्हीचा विशेष रिपोर्ट...

हे आहे नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ गाव. आज या गावात कोणीही राहत नाही. सर्वत्र निरव शांतता पसरली असून ढासळलेल्या घरांचे फक्त सांगाडेच शिल्लक राहिलेले पाहायला मिळतात. १८ ऑगस्ट २०२५ ची ती रात्र हसनाळ गावकऱ्यांसाठी 'काळरात्र' ठरली. वर्षभरापूर्वी याच दिवशी या परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. या मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला प्रचंड पूर आला आणि नदीवरील लेंडी धरणाचे बॅकवॉटर मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या हसनाळ गावकऱ्यांच्या घरात शिरले.

Nanded Flood
Nanded Flood

अचानक गावात पाणी शिरल्याने ७०० ते ८०० गावकऱ्यांनी प्राणांतिक धडपड करत जवळचा डोंगर गाठला आणि आपला जीव वाचवला. मात्र, या घटनेत ५ जणांचा बुडून मृत्यू झाला. गाव पूर्णपणे पाण्यात बुडाल्यामुळे गुरे-ढोरे, घरातील साहित्य, रोख रक्कम आणि दाग-दागिने सर्वकाही पुरात वाहून गेले. घटनेनंतर मंत्री, आमदार, खासदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेटी देऊन मोठी आश्वासने दिली; परंतु वर्ष उलटूनही एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

Nanded Hasnanal Flood
भाजपाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; तावडे, पवार अन् गांधींवर सर्वात मोठी जबाबदारी

गावालगतच्या डोंगरावर हसनाळ गावाचे पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, अद्याप प्रत्यक्ष पुनर्वसन झालेले नाही. सध्या येथील बाधित नागरिक तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या 'टीन शेड'मध्ये राहण्यास भाग पडत आहेत. बाधितांना पक्की घरे बांधून देणे तर दूरच, पण गावात जाण्यासाठी साधा रस्ता, पिण्याचे पाणी आणि विजेची सोयही उपलब्ध नाही. अशा अनेक मूलभूत समस्यांचा सामना करत गावकरी आपला दिवस काढत आहेत.

Nanded Hasnanal Flood
मोठी बातमी! बड्या नेत्याची भाजपने केली तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी, महाराष्ट्रात खळबळ

या महापुराला आज १८ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे; परंतु प्रशासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी या बाधितांची कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही. मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत आणि बाधितांना एनडीआरएफच्या (NDRF) निकषानुसार १० हजार रुपयांची तातडीची मदत मिळाली. मागील वर्षभरापासून हसनाळचे नागरिक शासनदरबारी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पाठपुरावा करत आहेत, तरीही त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. आजही प्रशासकीय अधिकारी "दोन दिवसांत सर्व विभागांची बैठक घेऊ", "गावात जाऊन पाहणी करू", किंवा "१५ दिवसांत मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू" अशीच पोकळ उत्तरे देत आहेत.

एक वर्ष उलटूनही हसनाळ आणि रावणगाव येथील बाधित नागरिक नरकयातना भोगत आहेत. शासनाने दिलेली आश्वासनेही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे चित्र आहे. आता तरी प्रशासनाने आणि सरकारने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन गावकऱ्यांचे त्वरित व पूर्ण पुनर्वसन करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com