संजय डाफ, नागपूर
Nagpur News: ऑनलाईन गेमिंगच्या (Online Game) माध्यमातून नागपुरमधील व्यापाऱ्यांची ५८ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कुख्यात बुकी अनंत जैनकडे (Anant Jain) आणखी घबाड सापडलं आहे. अनंत जैनच्या गोंदियामधील बँकेच्या ४ बँक लॉकरमधून तब्बल ४ कोटींचं सोनं आणि अडीच कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) गुन्हे शाखेने ही जप्तीची कारवाई केली आहे.
अनंत जैनने ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याची फसवणूक केली होती. या व्यापाऱ्याने नागपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. पोलिसांनी अनंत जैनविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन गेमिंग ॲप तयार करून हजारोंना फसवणारा बुकी अनंत जैन याच्या बँक लोकरमध्ये घबाड सापडलं आहे. ४ कोटींचं सोनं आणि अडीच कोटींची रोकड जप् करण्यात आली आहे. आरोपीचे नातेवाईकंही फरार आहेत.'
'आरोपीच्या गोंदियातील ॲक्सिस बँकेच्या चार वेगवेगळ्या लॉकरमधून घबाड जप्त करण्यात आले आहे. अनंत जैन यांच्या आणखी काही संपत्ती पोलिसांच्या रडारवर आहेत. अनंत जैन विदेशात पळून गेला असून त्याचे नातेवाईक तपासात सहकार्य कर नाहीत. पोलीस या प्रकरणाचा सर्वबाजूने तपास करत असून लवकरच यातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल.', असं देखील अमितेशकुमार यांनी सांगितले.
अनंत जैनने इतर काही लोकांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवल्याची माहिती पोलीस तपासामधून पुढे येत आहे. गोंदियातील अनंत जैनच्या घराची पोलिसांनी झडती घेतली त्यावेळी १७ कोटींची रोख रक्कम, साडेबारा किलो सोनं आणि ३०० किलो चांदी असा एकूण सुमारे २७ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला होता. यावेळी पोलिसांना त्याचे गोंदियातील विविध बँकांमध्ये चार लॉकर असल्याचे आढळून आले. लॉकरची झडती घेण्याची परवानगी मिळावी यासाठी गुन्हेशाखा पोलिसांनी न्यायालयात अर्ज केले.
न्यायालयाने लॉकरची झडती घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मंगळवारी गुन्हेशाखा पोलिसांनी आनंतच्या चारही लॉकरची झडती घेतली. यात ८५ लाखांच्या रोख रकमेसह चार कोटी ५४ लाखांचे दागिने आढळले. पोलिसांनी हा ऐवज जप्त केला. अनंत जैन सध्या दुबईत आहे. दरम्यान याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आरोपीने अॅड. देवेन चौहान यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला आहे.
पण आरोपीने अनेकांची कोट्यवधीने फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळण्यात यावा,अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली. दोन्ही पक्षाकडील युक्तीवादानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी करण्याचा आदेश दिला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.