गणेश कवडे
नागपूर : शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे आणि दिवसा ढवळ्या खून करणारे हे सरकार राज्यात सत्तेवर बसले असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याचे दानवे यांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथील रविभवन येथे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
राज्याचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी कडून आयोजित पत्रपरिषदेत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ नेते जितेंद्र आव्हाड, आमदार विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू, आमदार महेश सावंत, आमदार ज. मो. अभ्यंकर उपस्थित होते.
परभणीच्या घटनेवर फडणवीसांवर निशाणा
ईव्हीएमच्या आधारावर हे सरकार आलं आहे. परभणी येथे संविधानाची विटंबना झाल्यावर उमटलेल्या पडसादानंतर झालेल्या कोंबिग ऑपरेशन दरम्यान अटक केलेल्या सोमनाथ सोमवंशी या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाला. अशा सर्व घटना घडत असताना मुख्यमंत्री हे मिरवणुकीत गुंतले आहेत; असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. सरकारचे या सर्व घटनांकडे लक्ष आहे की नाही असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि समस्या हे सभागृहात जोरदर ताकदीने मांडणार असल्याची ग्वाही यावेळी दानवे यांनी दिली.
अधिवेशन अधिक कालावधीसाठी चालवावे
नवीन सरकार आल्यावर विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यावर तीन आठवड्याचे अधिवेशन असेल ही वैदर्भीय जनतेची अपेक्षा होती. विदर्भातील जनतेची अपेक्षा होती. त्याला हरताळ फासले गेले अशी टीका आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. तर सोयाबीनला हमीभाव नाही, धानाला भाव नाही, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी अपेक्षा होती. हे अधिवेशन अधिक कालावधीसाठी चालवावे; अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
कर्जमाफीची भूमिका स्पष्ट करावी
सोयाबीन, कापसाला भाव न देणारं सरकार आहे, दुधाचे भाव घसरलेले सरकार असून शेतकऱ्यांची दयनीय अवस्था करणारे हे सरकार असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. यावरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोयाबीन खरेदी केंद्र अजून सुरू झाले नाही. शेतकरी कर्जमाफीची भूमिका सरकारने स्पष्ट करावी; अशी मागणी केली आहे. तसेच बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यांचे प्रेत नासण्याचे काम हत्येकरांनी केले, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.