Stunt Viral Video
Mumbai Local Train Stunt VideoSaam TV

Train Stunt Video : लोकलमधील स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस अटकेसाठी घरी धडकले; पण धक्काच बसला, तरुणाने गमावला होता एक हात अन् पाय!

Stunt Viral Video : काही दिवसांपूर्वी धावत्या लोकलच्या दरवाजात लटकून फलाटावर पाय घासत स्टंट करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस तरुणाच्या शोधात त्याच्या घरी पोहोचले. पण त्यांनाही समोरचं दृश्य बघून धक्का बसला. त्या तरुणानं अन्य ठिकाणी स्टंट करताना हाय आणि पाय गमावला होता.
Published on

धावत्या लोकलच्या दरवाजात लटकून फलाटावर पाय घासत स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी लागलीच त्याची दखल घेतली. पोलिसांनी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला. त्याचवेळी तरुणाची ओळख पटली. त्याला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले. पण समोरचं दृश्य बघून पोलिसांनाही धक्का बसला. कारण या तरुणानं आपला एक हात आणि पाय गमावला होता. माहिती घेतल्यानंतर दुसरा एक धक्का बसला. अशाच प्रकारे लोकलमध्ये स्टंटबाजी करताना त्यानं हायपाय गमावले होते अशी माहिती मिळाली. फरहत आझम शेख असं या तरुणाचं नाव आहे.

Stunt Viral Video
Viral Video : मावशींचा बिजनेस जोमात, पब्लिक कोमात! चक्क धावत्या ट्रेनमध्ये थाटलं ब्युटी पार्लर; VIDEO पाहून डोकं धराल

धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करतानाचा काळजाचा ठोका चुकवणारा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल करून तपास सुरू केला. या तरुणाची माहिती घेता घेता त्याचं नाव आणि पत्ताही समजला. त्याला अटक करण्यासाठी पोलीस थेट घरी पोहोचले. तिथलं दृश्य बघून पोलीसही हादरले. या तरुणाला एक हात आणि पाय नव्हता. अन्य एका ठिकाणी अशाच प्रकारे स्टंट करताना त्यानं आपला एक हात आणि पाय कायमचा गमावला होता. रेल्वे पोलिसांनी काल, शुक्रवारी (२६ जुलै) ही धक्कादायक माहिती दिली.

शिवडी रेल्वे स्थानकात तरुणानं धावत्या लोकलमध्ये केलेल्या स्टंटबाजीचा व्हिडिओ १४ जुलैला सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. धावत्या लोकलच्या दरवाजातील हँडलबारला त्यानं पकडलं होतं. फलाटावर तो घसरत जात होता. लोकल प्रचंड वेगाने जात होती. फलाट संपतो न संपतो तोच हा तरुण चलाखीनं पुन्हा ट्रेनमध्ये चढला होता. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. शिवडी स्थानकात हा प्रकार ७ मार्चला घडला होता. त्याच्या एका मित्रानं हा व्हिडिओ शूट केला होता.

या स्टंटबाज तरुणावर कारवाई करावी, अशी मागणी नेटकरी करत होते. काही जणांनी तर प्रचंड संताप व्यक्त केला होता. या तरुणाला अद्दल घडलीच पाहिजे, अशा काही प्रतिक्रियाही होत्या. त्यानंतर रेल्वेनं दखल घेत, त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच अशा प्रकारे स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही रेल्वे पोलिसांनी दिला होता.

रेल्वे सुरक्षा दलानं या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास सुरू केला. या तरुणाची ओळख पटली. फरहात आझम शेख असं त्याचं नाव असल्याची माहिती मिळाली. तो वडाळा येथील अँटॉप हिल परिसरात राहत असल्याचे समजले. अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले. पण फरहातला बघून त्यांनाही धक्का बसला. त्याने आधीच एक हात आणि पाय गमावल्याचे दिसून आले. मशीद बंदर रेल्वे स्थानकात स्टंट करताना त्याने हायपाय गमावला होता. १४ एप्रिलला ही घटना घडली होती. घटना घडली त्यावेळी रेल्वे पोलिसांनीच त्याला सीएसएमटी येथील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याची प्रकृती बघता त्याला त्यावेळी अटक करण्यात आली नव्हती.

फरहात आताच या सर्व परिस्थितीतून बाहेर आला आहे. पण त्याची सध्याची प्रकृती बघता पोलिसांनी त्याला अटक केली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

फरहातला पश्चाताप, स्टंटबाज तरुणांना मेसेज

या घटनेनंतर पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्टंटबाजांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. स्टंटबाजीच्या नादात फरहातनं एक हात आणि पाय गमावला आहे. त्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलंय, असंही पोलिसांनी सांगितलं. फरहातनं स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांनाही एक संदेश दिला आहे. अशा प्रकारचे स्टंट करण्यापासून दूर राहा. ते फक्त बेकायदेशीर नाही तर जीवघेणेही आहे, असं तो म्हणालाय. मध्य रेल्वेनेही स्टंट करणाऱ्या तरुणांना आवाहन केलं आहे. अशा प्रकारच्या स्टंटबाजीपासून दूर राहा. हे जीवघेणे आहे. ते स्वतःसाठी आणि इतर प्रवाशांसाठीही धोकादायक आहे, असं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे.

Stunt Viral Video
Viral Video : मावशींचा बिजनेस जोमात, पब्लिक कोमात! चक्क धावत्या ट्रेनमध्ये थाटलं ब्युटी पार्लर; VIDEO पाहून डोकं धराल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com