Raj Thackeray : सरकार चुकतंय, असं जर जाणवलं तर..; CM फडणवीसांचं अभिनंदन करतानाच सरकारला राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray Warn To CM Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना इशारा सुद्धा दिलाय. सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांनी हा इशारा दिलाय.
Raj Thackeray
Raj Thackeray Warn To CM Fadnavis
Published On

महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच अभिनंदन केलं. मात्र अभिनंदन करताना राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना इशारादेखील दिलाय. सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर आम्ही विधिमंडळाच्या बाहेर सरकारला त्यांची चूक जाणवून देऊ, असा गंभीर इशारा राज ठाकरेंनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना दिलाय.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे २१ मुख्यमंत्री बनले आहेत. मुंबईत आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच्यसोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी पार पडल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी नव्या मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला गंभीर इशारा दिला.

सोशल मीडियावर अभिनंदनाची पोस्ट करत राज ठाकरेंनी नव्या सरकारला इशारा दिलाय. विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारूण पराभव झाला. जवळपास १५० जागांवर उमेदवार मनसेने दिले होते. मात्र एकाही उमेदवाराला या निवडणुकीत विजय मिळवता आला नाही. मात्र विधीमंडळात विरोधकांचा आवाज बनता आला नसला तरी मनसे रस्त्यावर विरोधकांचा आवाज बनणार आहे.

निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंनी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली होती. मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मनसेला अजून काही काळ समाजासाठी रस्त्यावर लढवावे लागणार आहे. पुढील पाच वर्ष राज ठाकरे आक्रमकपणे राजकारणात उतरणार असल्याचं दिसत आहे. नव्या सरकारला इशारा देतांना राज ठाकरेंनी चांगल्या कामांसाठी आपला पाठिंबा राहणार असल्याचं सुद्धा म्हटलंय.

Raj Thackeray
Devendra Fadnavis: फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे बॉस, मुख्यमंत्री असताना कोणत्या योजना आणल्या?

काय म्हणाले राज ठाकरे?

आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. खरंतर २०१९ ला ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे. त्याचा या राज्यासाठी, येथील मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल, अशी मी आशा करतो, असेही राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी होताच विरोधकांचा इशारा, कोणत्या ४ प्रमुख मागण्या केल्या?

तसेच पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा,असंही राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com