महेंद्र वानखेडे
मीरा भाईंदर : मिरा भाईंदर पालिकेच्या आरोग्य विभागाने धडक कारवाई केली आहे. रुग्णांचा आवश्यक तपशील न ठेवल्याने कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत मिरा-भाईंदरमधील ९ सोनोग्राफी केंद्रांचे नोंदणी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यात बड्या रुग्णालयांसह सोनोग्राफी केंद्रांचा देखील समावेश आहे.
मिरा-भाईंदर मनपाच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे शहरातील प्रसिद्ध रुग्णालय भक्ती वेदांतचा देखील समावेश आहे. मिरा-भाईंदर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून जानेवारी महिन्यात सोनोग्राफी केंद्रांच्या अचानक तपासणीसाठी २० दिवस शहरात विशेष मोहीम शासन आदेशानुसार राबवण्यात आली होती. सोनोग्राफी केंद्रांना रुग्णांची आवश्यक माहिती, रुग्णांचा अहवाल व इतर गोष्टींचा तपशील आदी गोष्टींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. ह्याच अटीवर त्यांना परवानगी दिली जाते.
मात्र, आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याकडे ४ रुग्णालयांतील सोनोग्राफी विभागात व ५ सोनोग्राफी केंद्रांनी पालन केले नसल्याचे विशेष पथकाच्या निदर्शनास आले होते. हे पीसीपीएनडीटी व वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन असल्याने संबंधित रुग्णालयांना नोटीसा बजावत खुलासा मागवण्यात आला होता. यावर त्यांच्याकडून अपेक्षित असे उत्तर प्राप्त न झाल्याने ९ सोनोग्राफी केंद्रांवर अखेर नुकतीच मनपा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. मनपाकडून तीन केंद्रांचे एक महिन्यासाठी तर सहा केंद्रांचे आठवडाभरासाठी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील खाजगी आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलीच खळबळ माजली असून त्याचे धाबे दणाणले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.