Market Committee Election Results: मतदारांचा कौल कोणाला? एका क्लिकवर पाहा राज्यातील सर्व बाजार समितींचे निकाल

Market Committee Election Results 2023: राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच पार पडली. यापैकी काही बाजार समित्यांचे निकाल आज जाहीर होणार आहेत.
Market Committee Election Results 2023
Market Committee Election Results 2023 saam tv

परळी, अंबाजोगाईत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना धक्का

बीडच्या परळीत पुन्हा एकदा धनंजय मुंडेची हवा. भाजप नेत्या पंकजा मुंडेंना कृषी उत्पन्न बाजार समितीत धक्का. परळी आणि अंबाजोगाई बाजार समिती धनंजय मुंडे यांच्या ताब्यात. अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 14 जागावर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप फक्त 3 जागांवर विजयी. अद्याप 1 जागेचा निकाल येणे बाकी आहे. अंबाजोगाई हे परळी आणि केज विधानसभा मतदारसंघ अंतर्गत संयुक्त आहे.

नंदूरबारमध्ये 18 पैकी 11 जागांवर शिवसेनेचा भगवा

नंदुरबार बाजार समितीत मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बसला आहे. बाजार समितीच्या 18 जागां 11 जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. डॉ. विजयकुमार गावित यांच्यासाठी नंदुरबार बाजार समिती प्रतिष्ठेची होती मात्र गावित यांना मोठा धक्का.

संगमनेरमध्ये थोरातांचंच वर्चस्व, विखेंना मोठा धक्का

संगमनेर कृषी बाजार समितीत तिसऱ्या फेरीतही थोरातांच्या पॅनलची आघाडी आहे. तिसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे 3 तर 1 अपक्ष उमेदवाराने मारली बाजी. 18 पैकी 11 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यातील 10 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला तर 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु अद्याप त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. उर्वरित 7 जागांची मतमोजणी सुरू आहे.

चांदवडमध्ये मविआचा झेंडा

नाशिकमधील चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या लोकमान्य परिवर्तन पॅनलने 10 जागांवर विजय मिळवला. येथे भाजपच्या शेतकरी विकास पॅनलला 7 जागा आणि एक जागा अपक्षने (प्रहार) जिंकली.

सांगलीत महाविकासआघाडीची निर्विवाद सत्ता

देशातील अग्रगण्य बाजार समिती मानल्या जाणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. 18 पैकी 17 जागांवर महाआघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला, तर 1 जागेवर व्यापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी झाला.

या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. भाजपाचे कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माज, मंत्री विश्वजीत कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने मिळवला दणदणीत विजय मिळवला.

नाशिकमध्ये मतमोजणी दरम्यान तुफान राडा

नाशिकच्या पिंपळगाव बाजरसमितीत मतमोजणीदरम्यान तुफान राडा झाला. अपक्ष उमेदवार यतीन कदम आणि माजी आमदार अनिल कदम हे समोरासमोर आल्याने त्यांच्या समर्थकांत राडा झाला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही गटाचे समर्थक पांगले.

नागपूर जिल्ह्यातील तीनही बाजार समितीचे निकाल हाती

नागपूर जिल्ह्यातील तीनही बाजार समितीचे निकाल हाती आले आहेत. पारशिवणी आणि मांढळ बाजार समितीमध्ये सर्व जागांवर काँग्रेस समर्थीत चे उमेदवार निवड निवडून आले आहेत, मात्र रामटेक मध्ये काँग्रेस आमदार सुनील केदार आणि शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या गटाचा पराभव झालाय. या ठिकाणी काँग्रेसचा बंडखोर गट असलेल्या शेतकरी सहकार पॅनल चे 14 उमेदवार निवडून आले आहेत, तर भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी आणि काँग्रेसचे गज्जू यादव यांच्या शेतकरी विकास सहकारी पॅनल चे चार उमेदवार निवडून आले आहेत. रामटेक मध्ये नेते हरले आणि कार्यकर्ते जिंकले असं चित्र आहे.

धुळे : दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपने झेंडा फडकावला असून 18 पैकी संपूर्ण 18 जागावर भाजप विजयी झाले आहे. दोन जागा बिनविरोध झाल्यानंतर 16 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या सर्वा 16 जागांवर देखील भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांचा पुन्हा एकदा करिष्मा बघावयास मिळाला. या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला.

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत भाजपने सत्ता राखली!

छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपने वर्चस्व राखले आहे. महाविकास आघाडीचे 4 तर भाजप-शिंदे गटाचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत.

भाजपचे विजयी उमेदवार

राधाकिसन पठाडे

अभिजीत देशमुख

श्रीराम शेळके

मुरली चौधरी

भागचंद ठोंबरे

गणेश दहीहंडी

दत्ता उकिरडे

जनाबाई ठोंबरे

सुजाता गायके

पुनमचंद बामणे

भागिनाथ नावपुते

महाविकास आघाडीचे

जगन्नाथ काळे

महेंद्र खोतकर

अब्दुल रहीम

कैलास उकिरडे

भुसावळ बाजार समितीवर भाजप शिंदे गटाची एक हाती सत्ता

भुसावळ बाजार समितीत आमदार संजय सावकारे यांच्या भाजप शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनल 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनल ला केवळ तीन जागांवर विजय झाला असून त्यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे नेते एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

अमरावतीत यशोमती ठाकूर यांचं वर्चस्व

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत आमदार यशोमती ठाकूर यांच्या गटाच्या १८ पैकी ८ जागा विजयी झाल्या आहेत. आमदार रवी राणा-भाजप गटाला आतापर्यंत एकही जागा जिंकता आलेली नाही. काँग्रेसचे बंडखोर माजी जिल्हापरिषद सदस्य प्रकाश भारसाकळे पराभूत झाले आहेत.

मिलींद तायडे, प्रकाश काळबांडे, राम खरबडे व प्रवीण अळसपुरे या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. अमरावतीत यशोमती ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. मतमोजणी केंद्राबाहेर यशोमती ठाकूर यांचे समर्थक जल्लोष करत आहेत.

थोरात आणि विखेंच्या लढतीत अपक्षाची बाजी...

संगमनेर कृषी बाजार समितीत विखे-थोरातांच्या उमेदवारांना धोबीपछाड देत अपक्षाने मारली बाजी आहे. हमाल मापाडी संघात सचिन कर्पे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले आहेत. त्यांनी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. कर्पे यांनी 147 पैकी 90 मते घेत विजय मिळवला. सचिन कर्पे यांनी निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

बारामतीत राष्ट्रवादीचं निर्विवाद वर्चस्व

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे १६ उमेदवार आघाडीवर आहेत. तर एक जागा बिनविरोध झाली आहे.

परळीत धनंजय मुंडेचे पॅनल आघाडीवर

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. परळीमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. या संघर्षात धनंजय मुंडेने आघाडी घेतली आहे. धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे 14 उमेदवार आघाडीवर आहेत, तर पंकजा मुंडे यांच्या पॅनलचा 1 उमेदवार आघाडीवर.

रामटेकमध्ये भाजप समर्थित पॅनेलला यश

नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटाच्या सर्व चार जागांवर भाजप समर्थित पॅनेलला यश. भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी आणि काँग्रेसचे गज्जू यादव यांनी संयुक्तपणे शेतकरी पॅनल लढवले होते. काँग्रेस नेते सुनील केदार आणि शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या पॅनलचा पराभव.

सांगलीत महाविकास आघाडीची बाजी

देशातील अग्रगण्य बाजार समिती मानल्या जाणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. येथील 18 पैकी 11 जागांचे निकाल हाती आले आहेत. पैकी 10 जागांवर महाआघाडीचे उमेदवार विजयी झाले, तर 1 जागेवर व्यापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी झाला.

साताऱ्यात भाजप-राष्ट्रवादीच्या पॅनलला मतदारांकडून भरभरून मतदान

साताऱ्याच्या मेढा बाजार समितीमध्ये शेतकरी विकास पॅनलची एक हाती सत्ता आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येत ही बजार समीती लढवली होती. त्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने 18-0 असा निकाल लागला.

मेढा बाजार समितीचे मतदान काल पार पडले यामध्ये 18 जागेंसाठी ही लढत होत आहे. त्यातील 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत तर 12 जागेसाठी 22 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकत्र लढताना पाहायला मिळाले. यांच्या विरोधात महाविकास आघाडी, ठाकरे गट,राष्ट्रवादीचा दुसरा गट आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र येऊन लढले होते.

भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे तिघे एकत्र येऊन लढले. त्यामुळे मेढा बाजार समितीमध्ये भाजप राष्ट्रवादी एकत्र समीकरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादीविरोधात राष्ट्रवादीचे दीपक पवार ठाकरे सेनेचे सदाशिव सपकाळ हे एकत्र येऊन लढत होते. परंतु या वेळी भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र केलेल्या शेतकरी विकास पॅनलला मतदारांनी भरभरून मते दिली. विरोधकांना या बाजार समितीमध्ये खाते सुद्धा उघडता आलेले नाही.

पंढरपूरमध्ये परिचारक गटाची एक हाती सत्ता

पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक गटाने एक हाती वर्चस्व मिळवले. 18 पैकी 18 जागा मिळवत परिचारक गटाने सत्ता कायम राखली आहे. तर विरोधी पाटील गटाचा दारूण पराभव‌ झाला. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी गुलाची उधळण करत जल्लोष केला. येथील बाजार समितीवर परिचारक गटाची गटाची गेल्या 25 वर्षांपासून सत्ता आहे.

हिंगोलीत एमआयएमचा उमेदवार विजयी

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या फेरीतील निकाल हाती आले आहेत. हमाल मापारी व व्यापारी फेरीमधील निकाल हाती आले असून यात भाजप 2 तर एमआयएम एका जागेवर विजयी झाले आहे.

पंढरपूरमध्ये भाजपचे वर्चस्व

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक गटाचे 10 उमेदवार विजयी झाले आहेत. मतमोजणीमध्ये विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात भाजप माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पॅनलचे वर्चस्व आहे. सोसायटी मतदारसंघात १० जागेवर परिचारक पॅनलचे उमेदवार विजयी अद्याप ३ जागांची मतमोजणी सुरू आहे.

संगमनेरमध्ये पहिल्या फेरीत थोरातांच्या पॅनलची आघाडी...

संगमनेर कृषी बाजार समितीत पहिल्या फेरीत थोरातांच्या पॅनलने आघाडी घेतली आहे. 18 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर झाले असून या चारही जागांवर महाविकास आघडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयासह थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने खाते उघडले आहे. विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. एकच साहेब, बाळासाहेब... महाविकास आघाडीचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो... अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहे.

महाविकास आघाडीचे 3, भाजपचा 1 उमेदवार विजयी

छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे तीन तर भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे.

महाविकास आघाडीचे तीन तर भाजपचा एक व हमाल मापाडी मतदारसंघातून एक व व्यापारी मतदारसंघातून दोन असे सात जागेचे निकाल जाहीर झाले आहेत. हमाल मापाडी तोलारी मतदारसंघातून देविदास कीर्तीशाहीहे विजयी ठरले तर व्यापारी मतदारसंघातून कन्हैयालाल जयस्वाल व निलेश सिठी हे विजयी ठरले. तर ग्रामपंचायत मतदार संघातून महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. यामध्ये कैलास उकिरडे, अब्दुल रहीम, महेंद्र खोतकर हे विजयी झाले तर भाजप शिवसेना महायुतीचे दत्ता उकिरडे हे विजयी झाले.

वर्धा: देवळी बाजार समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता

देवळी तालुक्यातील पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस, सहकार गट प्रणित संपूर्ण पॅनल निवडून आले. निवडणुकीत भाजपाचा सुपडासाफ झाला असून या निवडणुकीमध्ये भाजपाला खातेही उघडता आले नाही. काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी या बाजार समितीवर आपला कब्जा कायम ठेवला आहे.

पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मतदारानी पसंती दाखवली. कृषी उत्पन्न बाजार समिती देवळी पुलगावही निवडणूक काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे तसेच भाजपा खासदार रामदास तडस यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. मात्र काँग्रेस व सहकार गटाला मतदारांनी पसंती दाखवून भाजपाला नाकारल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्णच्या पूर्ण अठरा जागेवर काँग्रेसचा विजय झाला आहे. या बाजारसमितीवर एकहाती मिळालेल्या विजयाचा श्रेय आमदार रणजित कांबळे यांना देण्यात आले आहे. सोबतच येत्या काळात आमदार रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी आणखी चांगले काम करणार असल्याच मनोज वसू यांनी सांगितलं.

बुलढाण्यात 5 पैकी 3 बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा

मलकापूर - भाजपा प्रणित पेनेल - भाजपा १६ , अपक्ष १ , महाविकास् आघाडी १. ( सरशी माजी आ.चैनसुख संचेती

मेहकर - शिवसेना - ११ , महविकास् आघाडी - ७ . ( सरशी खा.प्रतापराव जाधव )

बुलढाणा - ठाकरे गट - १२ , भाजपा शिवसेना - ६ ( सरशी जालिंदर बुधवत , ठाकरे गट )

देऊळगाव राजा - महा विकास आघाडी - १५ , शिवसेना - १ , अपक्ष - २ (सरशी राष्ट्रवादी आ.राजेंद्र शिंगणे )

खामगाव - महविकास आघाडी - १६ , भाजपा - ०२ ( सरशी माजी काँग्रेस आ.दिलीप सानंदा )

जिल्ह्यात खामगाव व बुलढाणा बाजार समितीत आश्चर्यकारक निकाल लागले असून खामगाव येथे विद्यमान भाजपा आमदार आकाश फुंडकर यांना मोठा धक्का बसला असून भाजपा ला याठिकाणी फक्त दोन जागा मिळाल्या तर बुलढाणा बाजार समितीत विद्यमान शिवसेनेचे आ.संजय गायकवाड यांना नवख्या असलेल्या ठाकरे गटाचे जालिंदर बुधवत यांनी धोबीपछाड दिली आहे. आ.संजय गायकवाड यांनी याठिकाणी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती मात्र त्यांना मोठा धक्का बसला आहे.

पालघरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा

पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला आहे. 17 पैकी 17 जागा जिंकत महाविकास आघाडीने पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त केले. आधीच झालेल्या छाननीमध्ये 15 जागा बिनविरोध झाल्या होत्या तर आज झालेल्या व्यापारी अडते निवडणुकीत महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आले. त्यामुळे पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजप आणि शिवसेनेला एकही जागा मिळवता आली नाही.

अमरावतीत महाविकासआघाडीच भारी, भाजपचा सुफडा साफ

अमरावती जिल्ह्यात 6 बाजार समितीची निवडणूक शुक्रवारी झाली. यामध्ये अमरावती वगळता इतर बाजार समितींची मतमोजणी रात्री उशीरापर्यंत चालली. या निवडणुकीत महाआघाडी समर्थीत पॅनलने सर्वच 5 बाजार समित्यांमध्ये घवघवीत यश मिळविले आहे. यामध्ये तिवसा बाजार समितीत काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांचे सर्व १८ उमेदवार निवडून आले. चांदूर रेल्वेत काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्र जगताप यांचे 17 उमेदवार तर भाजप समर्थित पॅनल ला 1 जागा मिळाली. मोर्शी येथे हर्षवर्धन देशमुख, यशोमती ठाकूर आणि आमदार देवेंद्र भुयार गटाचे १० संचालक विजयी झाले आहेत. नांदगाव खंडेश्वर मध्ये अभिजित ढेपे आणि कमुनिस्ट पक्षाला 10 जागा मिळाल्या.

भाजप, शिंदे गट, प्रहार पॅनलचा पराभव

या निवडणुकीत भाजप, शिंदे गट, प्रहार पॅनलचा पराभव झालेला आहे. मोर्शी मध्ये खासदार अनिल बोंडे यांच्या पॅनलचा पराभव झाला. जिल्ह्यातील पाचही बाजार समितीत भाजप आणि शिंदे गटाला यश मिळालं नाही. त्या तुलनेत यशोमती ठाकूर यांनी आपला गड राखला. या विजयानंतर यशोमती ठाकुर यांनी कार्यकर्त्यांसोबत गुलालांची उधळण करत मोठा जल्लोष केला.

वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा

वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे व सहकार गटाचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या गटाने एकहाती सत्ता मिळविली आहे. पूर्ण १८ संचालक निवडून आले.भाजपाचा वर्धा बाजार समितीत दारुण पराभव झालाय. भाजपाकडून या निवडणुकीसाठी मोठी मोर्चे बांधणी करण्यात आली होती. मात्र मतदारांनी आमदार कांबळे यांच्या गटाला कौल दिलाय. दरम्यान हा जनतेचा कौल असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी व्यक्त केली.

पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीवर नाईकांचं वर्चस्व

यवतमाळच्या पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजीमंत्री मनोहरराव नाईक आणि आमदार इंद्रनिल नाईक यांचे वर्चस्व कायम राहिले असून कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मनोहरराव नाईक पॅनलचे आठरा पैकी 18 जागेवर उमेदवार निवडून आले आहे. या निवडणुकीत आमदार इंद्रनिल नाईक यांच्या नेतृत्वामध्ये भाजप प्रणित आघाडीचा सुपडासाफ झाला. माजी मंत्री मनोहर नाईक यांनी बंगल्यावर बसून व आमदार इंद्रनिल नाईक यांनी पुसद तालुक्यातील सर्व सोसायटी व ग्रामपंचायत व्यापारी हमाल गटाला योग्य मार्गदर्शन करून सर्व जागी उमेदवार भरघोस मतांनी निवडून आलेत.

संगमनेरमध्ये विखे-थोरात यांची प्रतिष्ठा पणाला

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनल विरोधात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप पुरस्कृत पॅनल उभा केलेला होता. काल या बाजार समितीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून ९७ टक्के मतदान झालं आहे.

संगमनेर बाजार समितीत आजतागायत थोरात यांच्या नेतृत्वात बिनविरोध परंपरा राहिली असून त्यांचेच एकहाती वर्चस्व राहिलं आहे. मात्र यावेळी विखे पाटलांनी विरोधात पॅनल उभा केल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे. थोरात सत्ता कायम ठेवणार की विखे पाटील काही चमत्कार घडवणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com