Marathwada scam : मराठवाड्यात मोठा घोटाळा, ७०० जणांना १०० कोटींचा गंडा

Marathwada scam : शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याचे आमिषाने १०० कोटींचा गंडा घालण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या एस.एम. आणि लक्ष्मी कॅपिटल विरोधात तक्रार दाखल झाली.
share market scam
share market scamSaam TV
Published On

Marathwada share market scam : मराठवाड्यातील मोठा घोटाळा समोर आला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करुन देतो, असे आमिष दाखवत ७०० जणांना तब्बल १०० कोटी रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवृत्त पोलीस, जवान अन् शिक्षकांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. एस.एम. आणि लक्ष्मी कॅपिटल विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

१०० कोटींचा गंडा -

शेअर बाजारात पैसा दुप्पट करण्याच्या आमिषाने एस.एम.कॅपिटल आणि लक्ष्मी कॅपिटलविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आली आहे. आतापर्यंत ५२ गुंतवणूक तक्रारीसाठी पुढे आले आहे. मराठवाड्यातील ७०० गुंतवणूकदारांना सुमारे १०० कोटींनी या कंपनीने गंडा घातला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे त्यात निवृत्त पोलिस,लष्करी जवान आणि शिक्षक यांचा समावेश आहे.

दुप्पट पैसे करुन देतो, आमिषाला लोक पडले बळी -

पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत लेखी तक्रार केली आहे. गारखेडा येथील खिंवसरा पार्क येथील एस. एम. कॅपिटल आणि लक्ष्मी कॅपिटल कंपनीचे मालक मनोज विष्णू भोसले, सुनील प्रभाकर उगलमुगले यांनी गुंतवणूकदारांना १ लाखाचे २० महिन्यांत २ लाख करून देण्याच्या योजनेवर पैसे घेतले. दर महिन्याला १० हजार याप्रमाणे हे २० हप्ते होते. काही दिवस नियमितपणे दिले. डिसेंबरमध्ये ५ हजार मिळाले आणि जानेवारीपासून टाळाटाळ सुरू केली.

या कंपनीत अशा ७०० जणांची १०० कोटींची गुंतवणूक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यांनी तगादा सुरू केल्यावर कंपनीने फोन बंद केला तेव्हा फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. गुंतवणूकदारांनी पुढे येण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी केले आहे.

काही दिवसापूर्वी एका मालकाने केली होती आत्महत्या -

गुंतवणूकदारांच्या तगाद्यानंतर लक्ष्मी कॅपिटलचे मालक सुनील यांनी तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. त्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्याच्या पत्नीच्या तक्रारीनंतर कंपनीचा दुसरा मालक मनोज याच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या दोघांनी एजंटमार्फत छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, बुलडाणा, भोकरदन अशा ठिकाणी जाळे पसरवले. एका गुंतवणूकदाराच्या मागे ५ टक्के एजंटांना दिले जायचे. गुंतवणूकदाराने आणखी एखादा गुंतवणूकदार आणला तर त्यालाही गुंतवणुकीच्या रकमेपैकी तीन टक्के पैसे दिले जात होते. त्यामुळे लोक फसत गेले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com