Marathi News live update: विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक

Maharashtra Political Breaking News 19th July 2024: मुंबईसह राज्याती काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसासह मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील ताज्या, राजकीय घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या...
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Maharashtra Congress : विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक सुरू आहे. भाजपच्या पत्रकार परिषदेला प्रतिउत्तर देण्यासाठी नवीन प्रवक्त्यांची आज यादी जाहीर होणार आहे. या बैठकीला बाळासाहेब थोरात , पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान यांच्या उपस्थित आहेत. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा होणार

Mukhyamantri Ladki Bahin Yojana  : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २ समित्यांची स्थापना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २ समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी लाभाथी नोंदणी Portal आणि लाभ अदायगी प्रणाली समिती स्थापना करण्यात आली आहे.

IAS Pooja Khedkar: मोठी बातमी! दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यामध्ये वडील दिलीप खेडकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिलीप खेडकर यांना पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दिलीप खेडकरांना २५ जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन पुणे सत्र न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे.

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणाची व्याप्ती वाढली, प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार

पूजा खेडकर प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे. UPSC ने दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण दिल्ली पोलिसांनी गुन्हे शाखेकडे केलं वर्ग आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे.

Microsoft Down : मायक्रोसॉफ्ट डाऊनचा कोल्हापुरातील विमानसेवेवरही परिणाम

जगभरात मायक्रोसॉफ्ट आउटेजमुळे झालेल्या गदारोळात कोल्हापूर विमानतळावरील दोन इंडिगो च्या विमानांना फटका बसला आहे. हैदराबाद येथे जाणाऱ्या विमानास 26 मिनिटे तर बंगळुरूला जाणाऱ्या विमानास सहा मिनिटे उशीर झाला. सर्व प्रवाशांना हस्तलिखित स्वरूपामध्ये बोर्डिंग पास व बॅगेज टॅग देण्यामध्ये इंडिगोच्या कर्मचाऱ्यांचा कस पणास लागला. तांत्रिक कारणास्तव स्टार एअरचे विमानाचे मुंबई कोल्हापूर मुंबई या सेक्टरला संचलन झाले नाही.

Pune Crime News : धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये कारने १५ दुचाकींना उडवलं

रावेत बीआरटीएस रस्त्यावर म्हस्के वस्ती जवळ एका कार ने १० ते १५ दुचाकींना ठोकरलं आहे. दरम्यान कार चालकाला पक़डून नागरिकांनी पोलिसंच्या टाब्यात दिलं आहें

Chhatrapati Sambhajinagar News : विशाळगडावरील प्रकरणावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाची निदर्शने

छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एमआयएमच्या वतीने विशाळगड प्रकरणी निदर्शने करण्यात आली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जवळपास दोन तास चाललेल्या या आंदोलनामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुस्लिमांवर झालेला अन्याय दूर करावा आणि तसे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी इम्तियाज जलील यानी केलीय.

Mumbai News: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ११ ऑगस्टला मतदान

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 11 ऑगस्टला मतदान होणआर आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या एका व विविध पंचायत समित्यांच्या चार रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 11 ऑगस्ट 2024 रोजी मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केले.

Mumbai News: निर्माणाधीन इमारतीच्या ठिकाणी मातीचा ढिगारा कोसळला, एकाचा मृत्यू तर दोन जखमी

मुंबईमध्ये निर्माणाधीन इमारतीच्या ठिकाणी मातीचा ढिगारा कोसळून एकाचा मृत्यू तर दोन जखमी झाले आहेत. मालाड पूर्वेकडील धनजीवाडी येथे ही दुर्घटना घडली आहे. मालाड पूर्वेकडील राणी सती मार्गावर असलेल्या धनजीवाडी येथे इमारत उभारणीचे काम सुरू असताना दुपारी ही दुर्घटना घडली. .

Karnataka News: कारवार - कर्नाटक महामार्गावर दरड कोसळली

कारवार - कर्नाटक महामार्गावर दरड कोसळली. कुमट्याजवळ पुन्हा दरड कोसळली. कारवार जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुर्घटनेतील मृतांचा आखडा वाढण्याची शक्यता आहे.

Kolhapur News: हात-पाय बांधून जवानाला विष पाजले, कोल्हापूरातील धक्कदायक घटना 

कोल्हापूरमध्ये हात-पाय बांधून जवानाला विष पाजल्याची घटना समोर आली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील नूल गावात ही घटना घडली आहे. जवानाला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. पत्नीसह अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाचे हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजले. जवानावर उपचार सुरू आहेत.

Pooja Khedkar: धक्कादायक! पूजा खेडकरने अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बनवलेलं बनावट रेशनकार्ड

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पूजा खेडकरच्या कुटूबीयांनी बनवलेलं बनावट रेशनकार्ड समोर आलं आहे. याच रेशनकार्डच्या आधारे पूजाने पिंपरी चिंचवड पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडे अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते आणि त्याच आधारे तिला डाव्या गुडघ्यात सात टक्के कायमस्वरूपी आधु असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आले होते.

Thane Accident : ठाण्यातील घोडबंदर रोडवर कंटेनरचा अपघात, मार्गावर मोठी वाहतूक कोंडी   

ठाण्यातील घोडबंदर रोड येथून वसईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा पातली पाडा पुलावर अपघात झाला आहे. सुदैवाने या घटनेत चालक बचावला आहेः. कंटेनर बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक कोंडी झाली आहे

Udayan Raje Bhosale : दिल्लीत शिवाजी महाराजांचं स्मारक उभे करा, उदयन राजेंची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोकशाहीचा ढाचा रचला आहे. शिवाजी महाराज यांनी त्यावेळी एक विचार मांडला होता, सर्वधर्म समभाव ही संकलपना त्यांनी दिली. शिवेंद्र राजे यांनी आपल्या मागण्यात अनेक गोष्टींचा उलेख केला आहे. त्यामुळे शिवाजी महाराज यांचं बुध्द सर्किट दिल्लीत सर्किट उभं करावं, अशी मागणी उदयन राजे भोसले यांनी केली आहे.

Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ; केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नोटीस

पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर यांना नोटीस बजावली आहे. पूजा खेडकर यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचा UPSC ने निर्णय घेतला आहे. तसेच पूजा खेडकर यांचं आयएएस केडर रद्द करण्या बाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Nashik News:  लाडकी बहीण योजनेत सामावून घ्या; नाशिकमध्ये अंगणवाडी कर्मचारी महिलांचा मोर्चा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी महिला कर्मचारी यांना सामावून घ्यावे, महिला कर्मचाऱ्यांना 15000 वेतन मिळावे, 20 लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळावे, इतर केडर्स प्रमाणे युनिफॉर्म लागू करा, शासन नियमाप्रमाणे शासकीय सेवेत सामावून घ्यावे, कार्यरत असलेल्या कुठल्याही स्वयंपाकी किंवा मदतनीस यांना विनाकारण कामावरून कमी करू नये, अशा विविध मागण्यांसाठी नाशिकच्या येवला येथे महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी राज्यव्यापी महिलांचा मोर्चा काढण्यात आला.

Raigad Breaking: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दुरावस्थेबाबत गुन्हे दाखल करा- खासदार सुनील तटकरे

खासदार सुनील तटकरेंची पोलीसांकडे लेखी तक्रार केलीय. त्यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दुरावस्थेबाबत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. नॅशनल हायवेचे अधिकारी व संबधित ठेकेदारांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना त्यांनी पत्र दिलंय.

Nanded Accident: नांदेडमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोचा अपघात, १ ठार 

हरीण अचानक समोर आल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोचा अपघात झाला. या अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झालाय. इतर चार विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत. नांदेडच्या उमरी तालुक्यातील हातनी फाटा येथे ही घटना घडलीय.

Pandharpur News: संत ज्ञानेश्वर महाराजांकडून भाऊबीजेसाठी मुक्ताईंना साडीचोळी भेट, सोहळा संपन्न

आषाढीच्या सोहळ्यानिमित्त सध्या सर्वच संत पंढरपुरात वास्तव्यास आहेत. अशातच संत ज्ञानेश्वर महाराजांकडून आपल्या लाडक्या बहिणीसाठी अर्थात संत मुक्ताईसाठी साडीचोळी भेट देण्याचा सोहळा आज संपन्न झाला. ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई यांची भेट पंढरपुरात होते. त्यामुळे भाऊबीजेची भेट म्हणून ज्ञानेश्वर महाराज संस्थान कडून मुक्ताईंना साडीचोळी दिली जाते. विशेष म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांकडून आलेली साडी चोळी संत मुक्ताई यांना भाऊबीजे दिवशी परिधान केली जाते.

Mumbai News: मुंबईच्या सायन परिसरातून दहा कोटी रुपयांचं एमडी जप्त

मुंबईच्या सायन परिसरातून दहा कोटी रुपयांचं एमडी जप्त करण्यात आलंय. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई आहे. एम एस शेख नावाच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात आलीय.

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात सर्वच भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू

पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवस चांगला पाऊस झाला त्यानंतर पावसाने पुन्हा उसंत घेतली होती. मात्र रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात पुन्हा जोर पकडला असून जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पालघर, डहाणू तलासरी भागात पावसाची संततदार कायम आहे. पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. जिल्ह्यातील सर्वच भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सध्या सुरू आहे.

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये बिबट्याचा हल्ला, सहा जखमी

चंद्रपूर जिल्ह्यातील मोहाळी येथे आज सकाळच्या सुमारास घुसलेल्या तीन बिबट्यांनी सहा जणांना जखमी केल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तीन बिबटे गावात आले. लोक शेतीच्या कामावर जाण्यासाठी बाहेर पडले असतानाच या बिबट्यानी लोकांवर हल्ले केले. यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

Raigad Breaking: रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये जोरदार पाऊस

रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पेण शहरासह तालुक्यातील सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या पुलाला धबधब्याचे स्वरूप आलंय. जोरदार पावसामुळे महामार्गावरून वाहन चालवताना अडचणी येत आहेत.

Ratnagiri Rain: राजापूरमध्ये पुर सदृश्य परिस्थिती,  कोदवली आणि अर्जुना नदीपात्राबाहेर पाणी

रत्नागिरी - राजापूर शहरात पुन्हा एकदा पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. राजापूर शहरातील बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका राजापूरला बसला आहे. कोदवली आणि अर्जुना नदी पात्राबाहेर पाणी आलंय. बाजापरेठेत पाणी शिरु लागल्याने व्यापारी पुन्हा एकदा धास्तावलेत.

Nashik News: नाशिकच्या अंबड एमआयडीसी परिसरातील बँकेवर दरोडा

नाशिकच्या अंबड एमआयडीसी परिसरातील बँकेवर दरोडा पडल्याची घटना घडली. बँकेतील स्ट्रॉंग रूम गॅस कटरच्या सहाय्याने तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केलाय.

Kalyan News: कल्याणमध्ये शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नसल्याने मनसे आक्रमक

कल्याणमध्ये शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नसल्याने मनसे आक्रमक झाल्याचं समोर आलंय. मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते शाळेचा गणवेश घालत ,बॅगा घालून , गळ्यात वॉटर बॉटल अडकवून महापालिका मुख्यालयात दाखल झालेत.

Navi Delhi: बिल्किस बानो प्रकरण; दोषींच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोषींच्या अंतरिम जामीन देण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार दिलाय.

Navi Delhi: विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती

विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. विनय मोहन क्वात्रा लवकरच पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळतेय. खलिस्तानी फुटीरतावादी आणि अमेरिकन नागरिकाची हत्या करण्याच्या कथित भारतीय कटावरून देशाचे संबंध ताणले असताना ही नियुक्ती महत्वाची मानली जाते.

Hingoli News: गोळीबाराच्या घटनेनंतर हिंगोलीत तणावपूर्ण शांतता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावातच ठोकला तळ

हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील आसोला गावात क्षुल्लक कारणावरून दोन जणांमध्ये राडा झाला. हिंगोली पोलिसांनी असोला गावात दंगा नियंत्रण पथकासह मोठा पोलीस फोजफाटा तैनात केलाय. गोळीबार करणाऱ्या आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Vishalgad Case: विशाळगड अतिक्रमण काढण्याला मुंबई हायकोर्टाची स्थगिती

विशाळगड अतिक्रमणासंदर्भात मोठं अपडेट समोर आलंय. विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.

Sindhugurg Rain: सिंधुदुर्गमध्ये मुसळधार!  तेरेखोल नदीने धोका पातळी ओलांडली

रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरात आळवाडी मच्छीमार्केट मध्ये पुराचे पाणी घुसले आहे. तेरेखोल नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तेरेखोल नदीची ६.२६० धोका पातळी असून ६.४०० सध्याची पातळी आहे. याच तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी बांदा मच्छीमार्केटमध्ये शिरले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना दुकाने उघडता आली नाहीत. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी बांद्यात आलेले पुराचे पाणी अद्याप ओसरलेले नाही.

Vishalgad Violence: विशाळगडावरील घटनेचा निषेध; बीडमधील सिरसाळा गावात बंद

विशाळगड येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावात बंद पुकारण्यात आलेला आहे. यानिमित्त संपूर्ण बाजारपेठ सकाळपासूनच बंद असून, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही तैनात केलेला आहे. तसेच दुपारी मुस्लिम बांधवांच्या वतीने रॅली काढण्यात येणार असून आज सिरसाळ्याची बाजारपेठ बंद असणार आहे. याबरोबरच बीड आणि परळी देखील आंदोलन करण्यात येणार आहे.

Nagpur Nand River Flood: नागपूरमधील नांद नदीला पूर, काही गावांचा संपर्क तुटला

नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील 'नांद' नदीला पूर आला आहे. या पुरामुळेवर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील गावे प्रभावित झाली आहेत. नागपूरच्या उमरेड आणि वर्धेच्या हिंगणघाट तालुक्यातील गावांचा समावेश असून दीवरील छोटे पूल पाण्याखाली आल्याने काही गावांचा संपर्क तुटला.

Solapur News: अमित शहा यांचा राजीनामा घ्या, सोलापूरात ठाकरे गटाची निदर्शने

काश्मीरमध्ये जवानांवर होणाऱ्या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या अमित शहा यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी करत भारतीय जवानांवर 78 दिवसात 18 वेळा काश्मीर मध्ये हल्ले झाल्याच्या निषेधार्थ आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Solapur Bus Accident: चालकाला फिट आल्याने बसचा अपघात; सोलापूरमधील घटना

सोलापूर जिल्ह्यात एसटी चालकाला फिट आल्यामुळे एसटी पलटी झाल्याची घटना घडली. टेंभुर्णी कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ हा अपघात झाला. एसटी चालकाला फिट येऊन तोल गेल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज. एसटीमध्ये 35 ते 40 प्रवासी असल्याची माहिती

High Court On RTE : आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द, राज्य सरकारला दणका

आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य असल्याचे म्हणत हायकोर्टाने राज्य सरकारला दणका दिला आहे. खासगी, विनाअनुदानित शाळांना आरटीईतून वगळ्याबाबत 9 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेला दिलेलंआव्हान हायकोर्टानं स्वीकारलं.

मे महिन्यातच हायकोर्टानं दिली होती या अधिसूचनेला स्थगिती. मात्र या काळात अन्य विद्यार्थ्यांना दिलेले प्रवेश बाधित करु नयेत, असे हायकोर्टाचे निर्देश आहेत. शिक्षण मराठी की इंग्रजीतून घ्यायाचं हा अधिकार पालकांचा व‌ विद्यार्थ्याचा आहे. अचानक नवीन नियम करुन त्यावर गदा आणली जाऊ शकत नाही, असा याचिकाकर्त्यांचा दावा कोर्टाला मान्य आहे.

Jalna News: राष्ट्र्वादीचे खासदार भास्कर भगरे मनोज जरांगेंच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे हे जरांगे पाटील यांच्या भेटीला आले आहेत. भाजपच्या भारती पवार यांचा पराभव करून भास्कर भगरे निवडुन आलेले आहेत. खासदार भास्कर भगरे यांच्या सोबत छगन भुजबळ यांचे विरोधक माणिकराव शिंदे हे ही जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेत.

Chandrapur News: मुसळधार पावसाचा फटका! चंद्रपूर- ताडोबा मार्ग बंद

ताडोबा मार्गावरील मोरघट नाल्याला पूर आल्यामुळे चंद्रपूरहून ताडोबाला जाणारा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे पर्यटक व या मार्गावरुन शाळेला ये जा जाणारे विद्यार्थी अडकले. रात्री आलेल्या पावसाने हा नाला दुथडी भरून वाहू लागला. पहाटेपासूनच हा मार्ग पूर्णतः बंद झाला. पर्यटक पर्यायी मार्गाने ताडोबाला रवाना झाले. तर विद्यार्थ्यांनी घराचा रस्ता पकडला.

Uttar Pradesh News: कावड मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर नेम प्लेट्स लावणे बंधनकारक; योगी सरकारचा निर्णय

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचा मोठा निर्णय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कावड यात्रेकरूंसाठी मोठे पाऊल उचलले आहे. आता उत्तर प्रदेशातील कावड मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर नेम प्लेट्स लावणे बंधनकारक आहे. कावड यात्रेकरूंच्या श्रद्धेच पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचा सरकारचा दावा आहे. पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे सरकारचे संकेत.

Prakash Ambedkar: 'मनोज जरांगेंनी २८८ जागा लढवाव्या', प्रकाश आंबेडकर

मनोज जरांगे यांनी 288 जागी विधानसभा निवडणुकी लढवली पाहिजे आणि ते लढतील अशी अपेक्षा आहे असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी नांदेडमध्ये माध्यमाशी बोलताना केले. विशाळगडाचा वादावर आंबेडकर यांनी थेट महाविकास आघाडीला विचार महाराष्ट्र कुठं चालला आहे. काँग्रेसचे 7 आमदार यांच्यावर क्रॉस वोटिंगचा आरोप केला तो आरोप चुकीचा असल्याचे आंबेडकर यांनी म्हणाले. चंद्रकांत हंडोरे यांना ज्यांनी पाडल त्यांची नावे काँग्रेसला माहीत आहे. मग त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल काँग्रेस पक्षाला प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

NCP News: पिपाणी चिन्ह गोठवलं, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभेच्या आधी राष्ट्रवादीसाठी मोठा दिलासा मिळत आङे.

Wardha Rain News: 'वर्ध्यात पावसाची बॅटिंग'; शाळांना सुट्टी जाहीर

वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीच्या ईशाऱ्यासह सुरु असलेल्या पावसामुळे पाच तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या समुद्रपूर, हिंगणघाट, वर्धा, देवळी, सेलू तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यध्यक्ष विजय कोंबे यांनी आज व उद्या सुट्टी जाहीर करण्याची केली होती विनंती

Congress Cross Voting: सर्वात मोठी बातमी! काँग्रेसच्या ५ आमदारांवर कारवाईचे आदेश 

विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग प्रकरणात काँग्रेस पक्ष ॲक्शन मोडमध्ये. 5 आमदारांवर कारवाई करण्याचे निर्देश मल्लिकार्जून खरगे यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये 2 आमदारांबाबत पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. कारवाई होणाऱ्या आमदारमध्ये झिशान सिद्दीकी ,सुलभा खोडके ,हिरामण खोसकर ,जितेश अंतापूरकर ,मोहन हंबिर्डे यांचं नाव असल्याची माहिती आहे.

Prasad Lad Threat: धक्कादायक! भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन 

भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन आल्याची बातमी समोर आली आहे. फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ, तसेच बघून घेऊ अशी धमकी देत शेकडो फोन आल्याचे सांगण्यात येत आहे.

CM Eknath Shinde Satara Visit: CM शिंदे, देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावर आहेत. साताऱ्यात आज छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय आणि ऐतिहासिक वाघनख्यांचे उद्घाटन होणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमला हजेरी लावणार आहेत.

Congress Meeting:  महाराष्ट्र काँग्रेसची आज महत्वाची बैठक

मुंबईतील गरवारे क्लब हाऊस, वानखेडे स्टेडियम, चर्चगेट येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आज बैठक होत आहे. ही बैठक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खा. के. सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेतील काँग्रेस गट नेते सतेज (बंटी) पाटील यांच्यासह प्रदेश कार्याध्यक्ष व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

Pune Accident: पुणे- बेंगलोर महामार्गावर अपघात; चालक जखमी

पुणे बंगलोर महामार्गावरील दरीपूलावर दोन कंटेनरचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती मिळताच पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून ३ वाहने दाखल असून जखमी वाहन चालकास जवानांनी बाहेर काढले आहे.

Beed News: बीडमध्ये 110 फूट उंच स्तंभावरून फडकला 20 बाय 30 फूट लांबीचा भगवा ध्वज

बीड शहरातील महत्त्वाच्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात, बीड नगरपालिकेने ऐतिहासिक काम केले आहे. या ठिकाणी पुतळ्याच्या समोरच्या बाजूस तब्बल 110 फूट उंच स्तंभ अन् त्यावर 20 बाय 30 फूट लांबीचा भगवा ध्वज फडकवला आहे. रात्री उशिरा याचे काम पूर्ण झाले आहे. यापूर्वी परळी आणि आष्टी शहरात 101 फुटांच्या स्तंभावर ध्वज फडकवण्यात आलेला आहे.

IAS Pooja Khedkar: मोठी बातमी! पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांकडून दुसऱ्यांदा नोटीस

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी दुसरी नोटीस दिली आहे. यामध्ये पूजा खेडकर यांना उद्याला बोलावल्याची माहिती आहे. हीच नोटीस घेऊन वाशिमच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी पूजा खेडकर यांची भेट घेतली.

Zika Virus : पुण्यात झिकाचा धोका वाढला

पुण्यात झिकाचा धोका वाढला आहे. पुणे शहरात गुरुवारी आणखी तीन रुग्णांना झिकाची लागण झाली. त्यामुळे झिकाच्या एकूण रुग्णांची संख्या २७ वर पोहाचली आहे.

NEET पेपर लीक प्रकरणी CBIची मोठी कारवाई

NEET पेपर लीक प्रकरणी CBIकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. CBI ने झारखंडच्या रांची मधून एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. आतापर्यंत या प्रकरणी CBIने काही लोकांना अटक केली आहे. मात्र विद्यार्थ्यावर कारवाई करण्याची ही पहिली केस आहे. MBBS २०२३ चा हा विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे.

Mumbai Traffic : मुंबईतील मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी

मुंबईतील मुलुंड टोल नाका वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यावर 2 ते 3 किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या आहेत .

सतत पडणार पाऊस ,सिंग्णल यंत्रणा ,खड्डे आणि टोल नाक्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे नोकरदारांचे प्रचंड हाल होत आहे.

Mumbai Rain Update :  मुंबईत पावसाचा जोर वाढला, रेल्वे सेवेवरही परिणाम

मुंबईत दादर, भायखळा, मरिन ड्राइव्ह, गिरगाव परिसरात पावसाचा जोर अधून मधून कायम आहे. जोरदार पावसामुळे अद्याप कुठेही पाणी साचले नाही. मुंबईत सकाळी मरिन ड्राइव्ह परिसरात पावसाची तुफान बॅटिंग पहायला मिळत आहे. या जोरदार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

Navi Mumbai Train : नवी मुंबईत सकाळपासून पावसाची रिमझिम

नवी मुंबईत सकाळपासून पुन्हा रिमझिम पावसाची संततधार सुरु आहे. नवी मुंबईसह पनवेल उरण विभागातही पावसाची संततधार सुरु आहे.जोरदार पावसामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे.

Sharad Pawar Nashik Tour :  शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर

शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत संध्याकाळी निफाडमध्ये शेतकरी मेळावा होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या विजयानंतर शरद पवार यांचा पहिलाच नाशिक दौरा असणार आहे.

Tomato price : टोमॅटोचे दर वाढले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

टोमॅटोचे दर वाढले आहे. त्याुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट गडबडले. राज्यातील सर्वच बाजारपेठेत टोमॅटोचे दर वाढले आहेत. आणखी एक महिना दर वाढलेले राहणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील काही बाजारात दर ६०-७० रुपये किलो टोमॅटो विकले जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com